मंत्री शंभूराज देसाईंचे संजय राऊतांना ओपन चॅलेंज! मतदारसंघात या, माझ्याविरुद्ध उभे राहा

सातारा:प्रतिनिधि

दि:२७:जुन:ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत  यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात येऊन केलेली टीका देसाई यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. मंत्री देसाई यांनी आज राऊतांच्या टीकेवर सडतोड प्रत्युत्तर दिले. लांबून गप्पा मारणाऱ्या राऊतांनी माझ्या मतदारसंघात येऊन राहावे. त्यांच्या जेवणा-खाण्याची चांगली व्यवस्था करतो. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन बोलण्यापेक्षा त्यांनी स्वतः माझ्याविरोधात बोलावे, असे आव्हान देसाई यांनी दिले.

खासदार संजय राऊत यांनी काल शंभूराज देसाई यांच्या पाटण (जि. सातारा) मतदारसंघात येऊन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर घणाघाती टीका केली होती. जसा खोक्यांचा भूकंप झाला तसे पाटण हे भूकंपाचे केंद्र आहे. महाराष्ट्रात कुठेही भूकंप झाला तरी पाटणाला केंद्रबिंदू शोधतात . त्यामुळे जनतेला अशा धक्क्यांचे काहीच वाटत नाही. त्यातूनही हा तालुका उभा राहतो. हा कसला धक्का मुंबईला भाऊचा धक्का बरा, असा टोला राऊत यांनी देसाईंना लगावला होता.

या टीकेला उत्तर देताना देसाई म्हणाले, लांबून गप्पा मारणाऱ्या राऊतांनी माझ्या मतदारसंघात येऊन राहावे. त्यांच्या जेवणा-खाण्याची चांगली व्यवस्था करतो. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन बोलण्यापेक्षा त्यांनी स्वतः माझ्याविरोधात बोलावे. माझ्या मतदारसंघात येऊन राहावे आणि माझ्याविरोधात उभे राहून दाखवावे. ठरवा २०२४ मध्ये का होतंय ते, असे आव्हान त्यांनी दिले.