गोकुळमुळे आटपाडी तालुक्यातील तसेच परिसरातील दुग्ध व्यवसायाला चांगले दिवस येतील.

आमदार विक्रमसिंह सावंत

कोल्हापूर :प्रतिनिधी 

दि .१८. गोकुळच्‍या क्‍लस्‍टर बल्‍क मिल्‍क कुलर युनिटचे उद्घाटन विजयनगर दूध व्यवसायिक सह.संस्था मर्या.पात्रेवाडी (शेटफळे), ता.आटपाडी, जि. सांगली येथे गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्‍या शुभहस्ते तसेच जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्‍या अध्‍यक्षतेखाली व इतर प्रमुख मान्‍यवराच्‍या उपस्थितीत गुरुवार दि.१७/०८/२०२३ इ. रोजी झाले.

यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्‍यक्ष जतचे आमदार विक्रमसिंह सावंत म्‍हणाले कि सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील दुग्‍ध व्‍यवसाय म्‍हणावा तसा वाढलेला नाही. यांचे कारण इथली जमीन, पाण्‍याची कमतरता व भौगोलिक स्थिती ही कारणे आहेत. परंतू गोकुळने आपल्या विविध योजना राबवुन दूग्ध व्‍यवसायाचे स्‍वरूप बदलण्याची किमया केली आहे. त्‍यामुळे गोकुळची  सांगली जिल्ह्यातील दूध उत्‍पादकांच्या मनात एक वेगळीच ओळख निर्माण झाली असून गोकुळमुळे आटपाडी तालुक्यातील तसेच परिसरातील दुग्धव्यवसायाला चांगले दिवस येतील असे मनोगत व्यक्त केले तसेच भविष्यात दूध उत्‍पादन वाढविण्‍यासाठी गोकुळला सर्वातोपरी सहकार्य करण्‍याची ग्‍वाही दिली.

यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि गोकुळ दूध संघ उभारण्यात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतदादा पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले होते. त्यांनी योग्य दिशा दाखवल्यामुळेच संघ चांगल्या प्रकारे वाटचाल करू शकला. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील विजयनगर दूध व्यवसायिक सह.संस्था मर्या.पात्रेवाडी (शेटफळे) येथे गोकुळचे हे पहिलेच बल्क कुलर युनिट आहे. हा भाग दुष्काळी असला तरी येथील दुधाची गुणवत्ता पाहता भविष्यात येथे दूध संकलनाची संधी मोठ्या प्रमाणात असून येथील दूध उत्‍पादकांनी दूध व्‍यवसाय किफायतशीर होण्‍यासाठी गोकुळच्‍या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन गुणवत्तापूर्ण दूध संघास पाठवावे, गोकुळ निश्चितच दूध उत्‍पादकांना त्यांच्या कष्टाचा मोबदला देईल असे आश्वासन दिले. तसेच तालुक्‍यात वेगवेगळ्या भागात भविष्यात क्‍लस्‍टर बल्‍क मिल्क कुलर्स युनिट सुरू करून दूध संकलन करण्याचा  गोकुळचा  मानस आहे. असे मनोगत या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी गोकुळचे संचालक किसन चौगले यांनी आपले मार्गदर्शन केले तसेच संघाचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. याप्रसंगी स्वागत व प्रस्ताविक विजयनगर दूध व्यवसायिक सह.संस्था मर्या.संस्‍थेचे संस्थापक हणमंतराव गायकवाड यांनी केले.

यावेळी या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, जतचे आमदार विक्रमसिंह सावंत, गोकुळचे संचालक किसन चौगले, प्रकाश पाटील, राजेंद्र मोरे व वसंतदादा दूध संघाचे चेअरमन अशोक पाटील, गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, वसंतराव गायकवाड, हर्षवर्धन देशमुख, संतोष पुजारी, राहुल गायकवाड, धनाजी गायकवाड, विलास गायकवाड, सौ.सुवर्ण गायकवाड, सौ.सुरेखा पोवार, तानाजी पाटील, जयदीप भोसले, गोकुळचे अशोक पाटील, डी.एम.पाटील, संकलन अधिकारी शरद तुरंबेकर, सहा.व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, शिरोळ सॅटेलाईट डेअरी व्यवस्थापक सचिन जाधव उपस्थित होते.