बैलगाडी शर्यतीच्या परवानगीसाठी उपविभागीय दंडाधिकारी प्राधिकृत

सांगली:प्रतिनिधी

दि:२४: नोव्हेंबर: जिल्ह्यामध्ये लम्पी चर्मरोग बाधित जनावरांची संख्या व रोगाची तीव्रता कमी झाल्याने शासन अधिसूचनेनुसार अटी व शर्तीस अधिन राहून जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी संबंधित उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे. याबाबतचा आदेश दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी निर्गमित केला आहे.

आदेशात म्हटले आहे, जिल्ह्यामध्ये लम्पी चर्मरोग बाधित जनावरांची संख्या खूप कमी झालेली असून रोगाची तीव्रता कमी झालेली आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेस चालना देण्याच्या दृष्टीने लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर शासन अधिसूचनेनुसार अटी व शर्तीस अधिन राहून जिल्ह्यातील बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्यास हरकत नाही असा संयुक्त अभिप्राय जिल्हा पशुसंवर्धन उप आयुक्त, सांगली व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्याकडून प्राप्त झाल्याने दि. 18 ऑगस्ट 2023 रोजीच्या निर्बंध आदेशामध्ये बदल करून लम्पी चर्मरोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बैलगाडी शर्यती भरविण्यास परवानगी देण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे.

आदेशात म्हटले आहे, संबंधित उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी बैलगाडी शर्यतीस परवानगी देत असताना जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त सांगली किंवा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद सांगली यांच्याकडून सदर शर्यत घेणेबाबत नाहरकत घेऊनच परवानगी देण्याची पुढील कार्यवाही करावी. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी शर्यतीस परवानगी देत असताना पशुसंवर्धन विभागाकडील दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजीच्या मंजूर टिपणीनुसार नमूद परिशिष्ट प्रमाणे व नमूद अटी व शर्ती तसेच इतर अन्य आवश्यक अटी व शर्ती आदेशामध्ये नमूद करावे.

या आदेशाची अंमलबजावणी पोलिस अधिक्षक, जिल्हा पशुसंवर्धन, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था व सर्व अनुषंगिक प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी काटेकोरपणे करावी, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.