क्रेडाई इचलकरंजीचे ग्राहकभिमुख सुसज्य कार्यालयाचे उदघाटन

इचलकरंजी : विजय मकोटे 

दि .३०:  क्रेडाई इचलकरंजीच्या कार्यालयाचे आणि सौ. सरस्वती रामकिशोर धूत सभागृहाचे उद्घाटन सांगली रोड येथील माणिक एम्पायर येथे उत्साहात पार पडले. याप्रसंगी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष खैरनार उदघाटक म्हणून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर उपस्थित होते. प्रारंभी क्रेडाई इचलकरंजीचे अध्यक्ष मयूर शहा यांनी स्वागत केले. त्यानंतर मान्यवर पाहुणे तसेच क्रेडाईच्या पैटर्न मेंबरशिप स्वीकारणाऱ्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सभागृहाला नाव देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल नितीन धूत परिवाराचाही सत्कार करण्यात आला.


ग्राहकांना चांगली सुविधा निर्माण करून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या क्रेडाई कार्यालयामधून ग्राहकांची सेवा सदैव घडत राहील असे सांगून श्री खैरनार यांनी घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सध्या दोन वेळा जीएसटीचा भुर्दंड बसतो. त्याचबरोबर रेरा कायद्यामुळे लहान बांधकाम व्यवसायिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. परिणामी कार्यात खंड पडण्याची भीती आहे. त्यामुळे जीएसटी कमी करण्याबरोबरच रेरा कायद्यात केंद्र शासनाने सुधारणा करावी. यासाठी खासदार माने यांनी विशेष प्रयत्न करावेत अशी मागणी केली.
प्रमुख पाहुणे खासदार धैर्यशील माने म्हणाले सन २०३० सालापर्यंत प्रत्येकाला घर मिळावे ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. ती पूर्ण करण्यासाठी इचलकरंजीतील बांधकाम व्यावसायिकांनी अग्रेसर रहावे. त्याचबरोबर जीएसटी आणि रेरा कायद्या संदर्भातील आपल्या अडचणीतून निश्चित पर्याय काढला जाईल. यामुळे सर्वसामान्य नागरिकालाही हक्काचे घर खरेदी करणे सोपे होईल. बिल्डर्स असोसिएशनने सर्व कार्यालये एकत्र आणून ग्राहकांना जलद सुविधा देण्याचा केलेला उपक्रम कौतुकास्पद आहे.
माजी आमदार हाळवणकर म्हणाले, क्रेडाईच्या कार्यालयामुळे रजिस्ट्रेशनसह सर्व प्रक्रिया एकाच ठिकाणी ऑनलाइन होणार असल्यामुळे ग्राहकांना घर खरेदी करणे सुलभ होणार आहे. रेरामुळे ग्राहकांची फसवणूक होत नाही. त्यामुळे क्रेडाई सदस्यांची तसेच बांधकाम व्यवसायिकांचीही विश्वासाहर्ता वाढली आहे. शासनाने वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याचे परिपत्रक काढले आहे. त्याचा भविष्यात बिल्डर असोसिएशनला फायदा होईल. तसेच वन नेशन वन टॅक्स याप्रमाणे जीएसटीमध्येही फेररचना करणे आवश्यक आहे. यासाठी जीएसटी कौन्सिल समितीपुढे हा विषय खासदारांनी मांडावा. त्यासाठी आपणही आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, पंतप्रधान आवास योजना पूर्ववत सुरू झाली आहे त्याचा वापर करणे आवश्यक आहे.शासनाने नुकतीच झोपडपट्टी पुनर्वसन योजना देखील कार्यान्वित केली आहे. त्यामध्ये क्रेडाईला जे बदल हवे आहेत ते सुचवावेत, त्याची पूर्तता केली जाईल. टाटा बिर्ला यांचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून क्रेडाई तसेच बिल्डर असोसिएशनने सर्वसामान्य नागरिकांपासून ते उच्च वर्गापर्यंत घर उपलब्ध करून देण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील राहावे.
यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष हिंदुराव शेळके, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव विदयानंद बेडेकर रणजीत लायकर, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, सय्यद गफारी, जहीर सौदागर, सम्मेद मगदूम, प्रितेश शहा, मोहित गांधी, राजू पाटील, फिरोज शिकलगार, चंद्रकांत भागाजे, विक्रमसिह राठोड, कैश बागवान, सौरभ जाधव, शिवकुमार हिराणी, वीरेन शहा, शुभम शर्मा, यशवंत राठोड, विजय गलगले, साजिद बेडक्याळे, तानाजी हराळे, अशोक सालेचा, अनिल निकम,अरिंजय पाटील यांचेसह बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिक, उद्योजक व मान्यवर, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी क्रेडाईचे संस्थापक माजी अध्यक्ष नितीन धूत यांनी आभार मानले. सूत्रसंचालन नंदकुमार शहा यांनी केले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×