प्रवेशाच्या पायघड्या… कडवई कुंभारवाडी शाळेत उत्साहात पहिलीचा प्रवेशोत्सव साजरा!
संगमेश्वर :दीपक तुळसणकर
दि .१९: कडवई कुंभारवाडी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडवई कुंभारवाडी येथे दिनांक १६ जून २०२५ रोजी इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव अतिशय आनंदमय आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील नवीन चिमुकल्यांचे स्वागत हे यंदा नाविन्यपूर्ण पद्धतीने – ‘पहिलं पाऊल’ (ठसे घेऊन) करण्यात आलं, ज्यामुळे हा दिवस अधिक संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रवींद्र कदम व उपशिक्षक श्री. समाधान पाटील यांनी अतिशय सुंदर तयारी केली होती. वर्गाची आकर्षक सजावट, रंगीबेरंगी फुगे, रांगोळी, संदेश फलक, स्वागत बॅनर यामुळे शाळा सणासारखी सजली होती.या वेळी मा. शिक्षण विस्तार अधिकारी श्री. प्रवीण पवार , अंगणवाडी सुपरवायझर मॅडम, न्यूज रिपोर्टर श्री. दीपकजी तुळसणकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा सोनाली कुंभार मॅडम, उपाध्यक्ष, सदस्य, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालकवर्ग आणि गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने नवागत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश आणि शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच सर्व बालगोपाळांसाठी गोड खाऊचे आयोजन करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यात आले.
सर्व मान्यवरांनी नवोदित विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि पालकांना सकारात्मक सहकार्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल प्रेम निर्माण झाले असून, गावकऱ्यांनी शाळेतील उपक्रमांचे कौतुक केले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.