खासदार धनंजय महाडीक यांची आशा व गटप्रवर्तक प्रतिनिधींशी बैठक

मानधन विषयक विविध मागण्यांवर चर्चा, लवकरच दिल्लीत स्वतंत्र बैठक

कोल्हापूर:रेणू पोवार 
दि.२१: आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच खासदार मा. श्री. धनंजय महाडीक यांची भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांविषयी सविस्तर चर्चा केली. केंद्र शासनाचे मागील सहा ते सात महिन्यांचे थकित मानधन अद्याप न मिळाल्यामुळे, आशा व गटप्रवर्तक कार्यकर्त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय कठीण झाल्याचे या भेटीत नमूद करण्यात आले.

या बैठकीत पुढील महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली:

1. खासदार महाडीक यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी थेट फोनवरून संपर्क साधून लवकरात लवकर मानधन संदर्भात अपडेट देण्याचे आश्वासन घेतले. यासोबतच, राज्याचे आरोग्यमंत्री यांच्याशी देखील त्यांनी चर्चा करून चार दिवसांत उत्तर देण्याचे आश्वासन मिळवले.

2. ‘प्रधानमंत्री मातृवंदन योजना (PMMVY)’ अंतर्गत आशा सेविकांनी भरलेले चार वर्षांचे ऑनलाईन फॉर्म असून त्याचे मानधन अद्याप देण्यात आलेले नाही. सदर योजना महिला व बालकल्याण विभागाकडे वर्ग करण्यात आली असून, आशांवरील हा अन्याय दूर करून त्वरित मानधन अदा करण्यात यावे, यावर भर देण्यात आला.

3. छत्रपती संभाजीनगर येथे सुरू करण्यात आलेल्या बायोमेट्रिक हजेरी पद्धतीविषयी, मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे सूचना देण्याचे आश्वासन खासदारांनी दिले.

4. गटप्रवर्तकांना याआधी कंत्राटी पद्धतीने ‘बॉन्ड’ घेऊन काम देण्यात येत होते. मात्र ती पद्धत रद्द करण्यात आली असून, त्यांना केवळ प्रवास भत्त्याच्या स्वरूपात मोबदला दिला जात आहे, ही बाब अन्यायकारक आहे. या संदर्भात ८/११/२०२३ रोजी राज्य आयुक्तांनी केंद्राकडे पाठवलेला PIP मनुष्यबळातील समावेशाचा प्रस्ताव मंजूर करण्यात यावा, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली.

खासदार श्री. महाडीक यांनी या सर्व मागण्यांचा पुढील पाठपुरावा दिल्ली पातळीवर करणार असल्याचे सांगत स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले. याशिवाय, संसदेत या मागण्यांचा मुद्दा मांडून केंद्र सरकारकडून योग्य तो निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करू, असे त्यांनी स्पष्ट केले.

या शिष्टमंडळाचे नेतृत्व नेत्रदिपा पाटील (राज्य अध्यक्षा, संघटना) यांनी केले, तर डॉ. प्रवीण चौधरी (राज्य सचिव) यांनी विशेष मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेच्या अनेक कार्यकर्त्या उपस्थित होत्या. त्यामध्ये मंदाकिनी कोडक, राधिका घाटगे, राणी खोत, सुनीता पाटील, शबाना पाटणकर, अनिता रावण, पद्मा दुरुगले, सुजाता पाटील, स्वाती पाटील, अनुराधा अंगठेकर, सुवर्णा पाटील, राजश्री देसाई, रूपाली गुरव, राणी माने, ज्योती टोणपे, पूजा चौगुले, काजल पटेल, स्नेहा, संध्या जाधव, विद्या जाधव यांचा समावेश होता.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.