गोव्यात ‘गोकुळ’च्या गुणवत्तापूर्ण दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा वाढवण्यासाठी संयुक्त सहकार्याची ग्वाही

पणजी (गोवा): रेणू पोवार 

दि. ३ जुलै: गोव्यातील नागरिकांना आणि पर्यटकांना दर्जेदार दूध व दुग्धजन्य पदार्थांचा स्थिर पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी गोवा राज्य शासन, गोवा मिल्क फेडरेशन व कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) यांच्या संयुक्त सहकार्याची ग्वाही देण्यात आली आहे.मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळ यांनी मुख्यमंत्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांचा श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा, पुष्पगुच्छ व गोकुळची दुग्ध उत्पादने देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “गोकुळचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे अत्यंत दर्जेदार आहेत. गोव्यातील नागरिक व पर्यटकांना या उत्पादनांचा लाभ मिळावा, यासाठी गोवा मिल्क फेडरेशन व गोकुळ यांच्या संयुक्त कार्यक्रमांची अंमलबजावणी केली जाईल. शासनाच्या वतीने आवश्यक सहकार्य व मार्गदर्शन दिले जाईल.”चर्चेत गोवा राज्यात गाय दूध व दुग्धजन्य पदार्थांचा दर्जेदार व नियमित पुरवठा करण्यासाठी सहकार्याची रूपरेषा तयार करण्यात आली. सध्या गोव्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात असून, पुरवठा मर्यादित असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. गोकुळसारख्या संस्थेच्या सहभागामुळे ही तफावत भरून काढता येईल, असा विश्वास व्यक्त झाला.

मध्यान्ह भोजन योजनेत विद्यार्थ्यांना गाय दूध पावडर किंवा दूध पुरविण्याबाबत, शेती उत्पन्न बाजार समितीद्वारे गोकुळचे दूध थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणे तसेच दुधावरील करात सवलत देण्यासंदर्भातही चर्चा झाली.गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “गोव्यासारख्या प्रगत व जागरूक राज्यात गोकुळची उत्पादने पोहोचवणे ही केवळ व्यवसायिक संधी नसून, गुणवत्तेची बांधिलकीही आहे. शासनाच्या सहकार्यामुळे आम्हाला आणखी प्रेरणा मिळाली आहे.”

या प्रसंगी माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, अमरसिंह पाटील, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, सचिन पाटील व अतुल शिंदे उपस्थित होते.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

×