मंत्रालयात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घेतली ध्यानातून अनुभूती सदगुरु श्री शिवकृपानंद स्वामींचे समर्पण ध्यान योग शिबीर संपन्न.

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही अनुभवला ध्यान संस्कार

मुंबई  : प्रतिनिधी 

दि.१८ :  ‘वसुधैव कुटुंबकम’ या तत्वज्ञानावर आधारित सद्गुरु श्री शिवकृपानंद स्वामी यांच्या हिमालयीन समर्पण ध्यान योग शिबिराचा दिव्य अनुभव मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला. मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी संघटनेतर्फे आयोजित या विशेष कार्यक्रमात सर्वांनी प्राचीन हिमालयीन ध्यान पद्धतीची अनुभूती घेतली.

 

      कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनीही या ध्यान सत्रात सहभागी होत साधनेचा लाभ घेतला. “स्वामींच्या प्रवचनातून प्राचीन अध्यात्माचे ज्ञान मिळते. या ध्यानयोगामुळे तरुणांमध्ये एकाग्रता, आत्मविश्वास वाढून संस्कारित नागरिक घडतील,” असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला.

        कार्यक्रमास गुरू मां रुचिरा मोडक, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश अग्रवाल, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, अपर मुख्य सचिव सीमा व्यास, डीव्हीईटीच्या संचालक माधवी सरदेशमुख, रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. अपूर्वा पालकर तसेच मंत्रालयातील मोठ्या संख्येने अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

         सद्गुरु शिवकृपानंद स्वामी यांनी तब्बल १६ वर्षे हिमालयात ध्यानसाधना केल्याचे सांगितले. “ध्यान हा गुरूच्या आत्म्याचा शिष्याच्या आत्म्यावर होणारा अध्यात्मिक संस्कार आहे. ध्यानाने मन, चित्त आणि विचारांची शुद्धी होते. अंतर्मुख झाल्याशिवाय देवाचा अनुभव मिळत नाही. देव म्हणजे विश्व चेतना,” असे त्यांनी स्पष्ट केले. ध्यानातून आत्मसाक्षात्कार साधण्याचे आवाहन करताना स्वामींनी सांगितले की, “आपल्यातला गुरू जागृत करा. विचारांची सफाई ध्यानातूनच होते आणि त्यामुळे अध्यात्मिक प्रगती साधता येते.”

             गडचिरोली परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आणि नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख संदीप पाटील म्हणाले, “योग ध्यानाशिवाय पूर्ण होत नाही. ध्यानामुळे ऊर्जा टिकते, ताण कमी होतो आणि एकाग्रता वाढते.”

यानंतर मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वामींसोबत अर्धा तास सामूहिक ध्यान केले. कार्यक्रमाच्या शेवटी स्वामींना मानपत्र प्रदान करण्यात आले. मंत्री लोढा यांचे खाजगी सचिव अजित देशमुख यांनी आभारप्रदर्शन केले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.