बायो-सीएनजी उपयुक्त; मात्र साठवणूक, सातत्य व धोरणात्मक अडथळ्यांची उत्तरे गरजेची: प्रकाश आवाडे

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.१९: सर्क्युलर इकॉनॉमीच्या दिशेने देशाची वाटचाल सुरू असताना बायो-सीएनजी हा साखर उद्योगासाठी तसेच देशाच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. मात्र बायो-सीएनजी प्रकल्प हा साखर कारखाना चालू असेपर्यंतच कार्यरत राहतो. त्यानंतर काय? त्याच्या साठवणुकीची व्यवस्था काय? या मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक तथा माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.
दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या वतीने कोल्हापूर येथे ‘सर्क्युलर इकॉनॉमीमधील बायो-सीएनजी : आव्हाने आणि पुढील वाटचाल’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. साखर कारखान्यांमधून निर्माण होणाऱ्या उप-उत्पादनांचा बायो-सीएनजी निर्मितीसाठी प्रभावी वापर कसा करता येईल, यावर यावेळी उपस्थित तज्ज्ञांनी सविस्तर मते मांडली.
माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले की, बायो-सीएनजी प्रकल्प उभारणीसाठी मोठा भांडवली खर्च, आधुनिक तंत्रज्ञानाची उपलब्धता, कच्च्या मालाचा सातत्यपूर्ण पुरवठा, धोरणात्मक अडथळे व बाजारपेठेतील मर्यादा ही मोठी आव्हाने आहेत. इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी दिली असली तरी त्याच्या विक्रीसाठी आवश्यक पंप सुरू करण्यास अद्याप मंजुरी नाही. सेंद्रिय कचऱ्यापासून बायो-सीएनजी निर्मिती ही पर्यावरणपूरक व शाश्वत उपाययोजना असली तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीत अनेक अडचणी येत आहेत.
पूर्वी साखर कारखाने सुमारे १८० दिवस चालायचे; मात्र सध्या हा कालावधी घटून अवघ्या १०० दिवसांवर आला आहे. त्यामुळे बायो-सीएनजी प्रकल्पही कारखाना सुरू असेपर्यंतच चालतो. उर्वरित २६५ दिवस प्रकल्प बंद राहिल्यास कर्जावरील व्याज मात्र भरावेच लागते. त्यामुळे अशा प्रकल्पांसाठी सरकारने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. अन्नधान्याच्या साठवणुकीसाठी गोदामे उपलब्ध करून दिली जातात; मात्र बायो-सीएनजीच्या साठवणुकीसाठी कोणती ठोस तरतूद आहे, याचाही विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बायो-सीएनजीकडे वाटचाल करताना सल्फरलेस उत्पादनावर लक्ष केंद्रित करावे, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी बायो-सीएनजी हे स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि शाश्वत इंधन असून सर्क्युलर इकॉनॉमी संकल्पनेला बळ देणारे असल्याचे सांगितले. साखर कारखान्यांतून निर्माण होणारा प्रेसमड, मोलॅसिस तसेच इतर सेंद्रिय अवशेषांचा बायो-सीएनजी निर्मितीसाठी प्रभावी वापर करता येतो. यामुळे हरितगृह वायू उत्सर्जनात घट होऊन पर्यावरण संरक्षणास चालना मिळेल, तसेच शेतकरी व साखर उद्योगासाठी अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील, असे त्यांनी सांगितले. यासाठी शासनाकडून सुसंगत धोरणे, अनुदान योजना, खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन व जनजागृती आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
चर्चासत्राच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. दि शुगर टेक्नॉलॉजिस्टस् असोसिएशन ऑफ इंडिया, नवी दिल्लीचे अध्यक्ष संजय अवस्थी यांनी स्वागत करून प्रास्ताविकात चर्चासत्राचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन, पुणेचे अध्यक्ष सोहन शिरगांवकर, व्हीएसआयचे संभाजी कडू-पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद बेलसरे, जनरल सेक्रेटरी अमित खट्टर, अनुप केसरवाणी, क.आ. जवाहर साखर कारखान्याचे संचालक सुनील पाटील यांच्यासह देशातील विविध राज्यांतून आलेले साखर उद्योगातील जाणकार, संशोधक, तंत्रज्ञ, अभियंते, केमिस्ट व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच डॉ. सीमा परोहा, डॉ. अनंतलक्ष्मी रंगनाथन, शिखा सिंग (एनएसआय, कानपूर), अनुराग गोयल, राहुल चावला, संजय देसाई, डॉ. काकासाहेब कोंडे, डी. एम. रासकर, आर. एस. शेवाळे, अभिजीत सिंग चौहान, जी. आर. महेश, एन. सत्यनारायणन आदी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!