लिगाडे मळ्यात स्वस्त धान्य दुकानदाराची मनमानी
नगरसेवक राजू बोंद्रे यांच्या हस्तक्षेपाने शिधापत्रिकाधारकांना दिलासा
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.१९: इचलकरंजी शहरातील लिगाडे मळा परिसरातील स्वस्त धान्य दुकानदाराने शिधापत्रिकाधारकांना नियमानुसार धान्य न देता कमी धान्य दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या अन्यायाविरोधात संतप्त शिधापत्रिकाधारकांनी नगरसेवक राजू बोंद्रे यांच्याकडे धाव घेत तक्रारी मांडल्या. तक्रार मिळताच बोंद्रे यांनी तात्काळ संबंधित स्वस्त धान्य दुकानात भेट देऊन प्रत्यक्ष चौकशी केली व पुरवठा अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधित दुकानदारावर कारवाईची मागणी केली.
लिगाडे मळ्यातील स्वस्त धान्य दुकानातून दुकानदार मनोज कुंभार यांनी गेल्या महिन्यात शिधापत्रिकेवरील कुटुंबातील सदस्यसंख्येनुसार धान्य न देता कमी धान्य दिल्याची तक्रार होती. तसेच १३ जानेवारीपासून बंद असलेले हे दुकान पुन्हा सुरू झाल्यानंतरही प्रत्येक शिधापत्रिकेतील एक ते दोन व्यक्तींचे धान्य कमी दिले जात असल्याचे निदर्शनास आले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता.
नगरसेवक राजू बोंद्रे यांनी दुकानात जाऊन विचारपूस केली असता दुकानदाराने कमी धान्य दिल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बोंद्रे यांनी पुरवठा अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत संबंधित दुकानदारावर कारवाई करण्याची तसेच गेल्या व चालू महिन्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना नियमानुसार पूर्ण धान्य देण्याची मागणी केली. पुरवठा अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती घेऊन ज्यांना कमी धान्य दिले आहे त्यांना नियमानुसार धान्य दिले जाईल व दुकानदारावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.
महापालिका निवडणूक निकालानंतर सत्कार व कार्यक्रमांमध्ये अडकून न पडता अवघ्या दोन-तीन दिवसांतच नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी सक्रियपणे काम सुरू केल्याने नगरसेवक राजू बोंद्रे यांची परिसरात चर्चा होत आहे. वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्यात येणार असल्याचेही बोंद्रे यांनी स्पष्ट केले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.