गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा : राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू
मुंबई: प्रतिनिधी
दि.२४: देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय असले पाहिजे. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासन सातत्याने कार्यरत असून या क्षेत्रातील नवोपक्रमांना संशोधनासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. प्रत्येक भारतीयाला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहचविणे हेच देशसेवेचे महत्त्वपूर्ण अंग असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अधोरेखित केले.

लोक भवन येथील दरबार सभागृहात पी. डी हिंदुजा रुग्णालयाच्या ‘जीवन वाचवणे आणि निरोगी भारत निर्माण करणे’ या देशव्यापी मोहिमेच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मोहिमेचे उद्घाटन राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, देशात औषधनिर्मिती आणि आरोग्य सुविधांच्या क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. सर्व देशवासी निरोगी राहावेत, यासाठी आयुष्यमान भारत अंतर्गत एक लाखांहून अधिक आरोग्य मंदिर कार्यरत आहेत. तसेच मिशन इंद्रधनुष्य सारख्या उपक्रमांद्वारे लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे. देशात 12 कोटींहून अधिक कुटुंबांना आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्यात आले असून यामुळे लाखो नागरिकांना उपचारांचा आधार मिळाला आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही तातडीच्या वैद्यकीय सेवांना प्राधान्य देत रुग्णवाहिका सेवा व ट्रॉमा केअर सेंटरच्या सुविधा वाढविण्यावर भर दिला आहे. यासोबतच जनसामान्यांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे अत्यावश्यक आहे. योग्य वेळी उपचारांची माहिती व सुविधा उपलब्ध झाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात,असेही त्यांनी नमूद केले. देशात अनेक महत्त्वपूर्ण औषधांचे उत्पादन होत असले तरी काही वैद्यकीय उपकरणे व औषधे आयात करावी लागतात. ती देशातच तयार व्हावीत यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहनही राष्ट्रपती मुर्मू यांनी केले.
कोविडनंतरच्या काळात मानसिक आरोग्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. एकाकीपणा, उदासीनता यांसारख्या समस्यांमुळे वैयक्तिक, कौटुंबिक व व्यावसायिक आयुष्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे मानसिक आरोग्य सेवाही तितक्याच सक्षमपणे उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केली.

वैद्यकीय शिक्षणासाठी पदव्युत्तर पदवीच्या जागा वाढविण्यात आल्या आहेत. दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनेक राज्यांमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान रुग्णालये सुरू करण्यात आली असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. हिंदुजा हॉस्पिटल समूह यांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या “जीव वाचविणे, निरोगी भारत निर्माण करणे” (Saving Lives, Building a Healthier Bharat Mission) या अभियानाचे त्यांनी कौतुक केले. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमांतर्गत दुर्गम व ग्रामीण भागात रुग्णसेवा पुरविण्यात येणार असून तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून जीव वाचविण्याचे पुण्यकर्म या अभियानाच्या माध्यमातून होत असल्याचे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी काढले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.