कबनूर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर; शासन आदेश आठवड्याभरात : प्रकाश आवाडे
कबनूर: हबीब शेखदर्जी
दि.२५: हातकणंगले तालुक्यातील कबनूर ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर करण्याची दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रक्रिया पूर्णत्वास आली असून येत्या आठवडाभरात कबनूर नगरपरिषदेसंदर्भातील शासन आदेश जाहीर होणार असल्याची माहिती माजी आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली.

इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर गावाची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून सध्या ती सुमारे ८० हजारांच्या घरात पोहोचली आहे. औद्योगिक विस्तारामुळे गावाचा वेगाने विकास होत असला तरी ग्रामपंचायतीच्या मर्यादित यंत्रणेमुळे आवश्यक नागरी सुविधा पुरविताना अडचणी येत होत्या. परिणामी नागरिकांच्या तक्रारींमध्ये वाढ होत होती.ग्रामपंचायतीचे नगरपरिषदेत रूपांतर व्हावे यासाठी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे तसेच आमदार राहुल आवाडे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला होता. यासंदर्भातील आवश्यक ठराव ग्रामपंचायतीकडून नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला होता. सध्या हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून शासनाचा अध्यादेश लवकरच प्रसिद्ध होणार आहे.या निर्णयामुळे कबनूरमध्ये पाणीपुरवठा, रस्ते, गटारे, स्वच्छता, वीज, आरोग्य व इतर मूलभूत नागरी सुविधा अधिक सक्षम पद्धतीने उपलब्ध होतील, तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या कायमस्वरूपी मार्गी लागतील, असेही आवाडे यांनी सांगितले. या प्रक्रियेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले.या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून अनेकांनी आनंद व्यक्त केला. यावेळी कबनूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुधीर लीगाडे, ग्रामीण भाजप मंडळ अध्यक्ष बाळासाहेब माने, मधुकर मणेरे, समीर जमादार, प्रदीप मणेरे, विद्यासागर चराटे, भाजप अध्यक्ष बबन केटकाळे, सिद्धार्थ इंगवले आदी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.