ओमप्रकाशजी छाजेड यांची अडत व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड; सत्कार सोहळ्यात व्यापारातील प्रश्नांवर मंथन
इचलकरंजी: विजय मकोटे
दि. २८ : दि इचलकरंजी पॉवरलुम क्लॉथ अॅण्ड यार्न मर्चंट (अडत) असोसिएशनच्या अध्यक्षपदी ओमप्रकाशजी छाजेड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी कापड व्यापाराच्या सध्याच्या स्थितीवर आणि भविष्यातील दिशा यावर मते मांडली.
कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी अडत व्यापारी, कारखानदार व दलाल यांच्या समन्वयातून चालणाऱ्या कापड व्यापारात अधिक पारदर्शकता यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, परस्पर विश्वास आणि संवादातूनच व्यापार अधिक गतिमान होऊ शकतो.
यावेळी पॉवरलुम असोसिएशनचे उपाध्यक्ष रफिक खानापूरे, संचालक सतीश कोष्टी, दलाल असोसिएशनचे बाळासो ओझा, कारखानदार बाळकृष्ण पोवळे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
विशेषतः, कारखानदार थेट पाली, बालोत्रा आदी ठिकाणी कापड विकत असल्याने दलाल व अडत्यांची संख्या कमी होत चालली आहे, याकडे लक्ष वेधण्यात आले. यासोबतच व्यापारातील काही अनिष्ठ प्रथांबाबतही चिंता व्यक्त करत सुधारणा सुचविण्यात आल्या.
ट्रान्सपोर्ट असोसिएशन व माथाडी कामगारांच्या समस्यांबाबतही बैठकीत चर्चा झाली. सर्व संबंधित संघटनांनी वेळोवेळी विचार विनिमय करून कापड व्यापार अधिक वृद्धिंगत करणे आणि इचलकरंजीचा औद्योगिक विकास साधण्याचे उद्दिष्ट पुढे ठेवले.
कार्यक्रमास पॉवरलुम असोसिएशनचे संचालक सोमाण्णा वाळकुंजे, पांडूरंग सोलगे, सुभाष बलवान, दत्तात्रय टेके, राजाराम गिरी, अडत व्यापारी असोसिएशनचे ओमप्रकाश वेदमुथा, चंद्रकांत सुतार, प्रकाश वेद मेहता, ईश्वर शेखावत, मनोहर ओझा, शामलालजी पारीख, पियुष सालेचा, मिलिंद बिडकर यांच्यासह शहरातील नामवंत कारखानदार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी ओमप्रकाशजी छाजेड यांनी आपल्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडताना सर्व व्यापारी वर्ग, कारखानदार व दलाल यांच्यात समन्वय साधून व्यापारास अधिक गती देण्याचा संकल्प व्यक्त केला.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.