इचलकरंजी: विजय मकोटे
दि.१३: येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलमध्ये शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांतर्गत “अक्षरशिल्प” या अभिनव प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.हे प्रदर्शन राजेंद्र कडाळे यांच्या संकल्पनेतून साकारले गेले.प्रसिद्ध अक्षरलेखक उत्तम तळवार यांनी सादर केलेल्या या प्रदर्शनात मराठी अक्षरांचे विविध कलात्मक नमुने मांडण्यात आले होते.
टाकाऊ साहित्यापासून तयार केलेली आकर्षक अक्षरे सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.विविध साहित्यिकांनी लिहिलेल्या हस्तलिखित पत्रांचे नमुनेही प्रदर्शित करण्यात आले होते.तसेच नामवंत अभिनेते व कलाकार यांच्या पत्रलेखनाचे नमुने पाहायला मिळाले.अक्षरलेखनाच्या इतिहासाबद्दल तळवार सरांनी सविस्तर माहिती दिली.सुंदर व शिस्तबद्ध अक्षरलेखनाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थिनींना समजावून सांगितले.त्याचबरोबर प्रत्यक्ष काही अक्षरनमुने लिहून दाखवून प्रात्यक्षिकही सादर केले. विद्यार्थिनींनी मोठ्या उत्सुकतेने हे प्रात्यक्षिक अनुभवले.प्रदर्शनाला शाळेतील विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त व भरघोस प्रतिसाद मिळाला.अनेक विद्यार्थिनींनी प्रश्न विचारून अक्षरलेखनाबद्दल अधिक माहिती जाणून घेतली.