माणसांच्या मनात घर करणारे ‘दादा’!

श्रीपतराव बोंद्रे यांच्या स्मृतींना २६ वर्षांनंतरही उजाळा; सेवाभाव, नैतिकता आणि सामान्यांशी जपलेले नाते आजही प्रेरणादायी

     काही माणसे काळाच्या ओघात इतिहासाचा भाग होतात; पण काही व्यक्तिमत्त्वे इतिहासाच्या पानांपलीकडे जाऊन माणसांच्या मनात कायमची घर करून राहतात. कै. श्रीपतराव बोंद्रे दादा हे अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक. दि. ३० सप्टेंबर २००० रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाला आज २६ वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, त्यांच्या कार्याच्या आठवणी, सामान्य माणसाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते आणि सार्वजनिक जीवनातील नैतिकतेचा त्यांनी घालून दिलेला आदर्श आजही स्मरणात आहे. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!

                श्रीपतराव बोंद्रे दादांचे जीवन म्हणजे संघर्षातून उभ्या राहिलेल्या नेतृत्वाची कहाणी होती. बालपणापासूनच त्यांच्या अंगी श्रमाचे संस्कार रुजले होते. शेती, पिके आणि जनावरांशी त्यांचा जवळचा संबंध होता. कोल्हापुरातील कपिततीर्थ मार्केटमध्ये त्यांनी भाजी विक्रीही केली. त्यामुळे कष्टकरी, शेतकरी आणि गोरगरीब जनतेच्या जीवनाशी त्यांचे नाते केवळ राजकीय नव्हते, तर ते त्यांच्या जगण्याचा एक भाग बनले होते. सामान्य माणसाच्या सुख-दुःखाची जाणीव त्यांना अनुभवातून मिळाली होती. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात तरुण वयातच त्यांनी भूमिगत कार्यकर्त्यांना निरोप पोहोचविणे, त्यांच्यासाठी भाकरी घेऊन जाणे अशा स्वरूपाची कामे केली. अनेक स्वातंत्र्यसैनिकांशी त्यांचा संपर्क आला. १९४२ मध्ये महात्मा गांधी यांनी मुंबईतील ग्वालिया टँक मैदानावरून ‘चले जाव’चा नारा दिला, त्यावेळी आपण तेथे उपस्थित होतो, हे दादा अभिमानाने सांगत. स्वातंत्र्यलढ्यात प्रत्यक्ष सहभागी होण्याचा अभिमान त्यांच्या मनात अखेरपर्यंत जिवंत होता.

सहकारातून विकासाची नवी वाट

       स्वातंत्र्यानंतरच्या काळात महाराष्ट्रात सहकाराची चळवळ रुजत होती. त्याच काळात दादांवर यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा प्रभाव पडला. समाजाचा विकास केवळ राजकीय सत्तेतून नव्हे, तर सहकार आणि सामूहिक प्रयत्नांतून होतो, या विचाराने त्यांनी काम सुरू केले. फुलेवाडी येथे सहकारी तत्त्वावरील हौसिंग सोसायटी उभारण्याचे धाडसी पाऊल त्यांनी उचलले. या सोसायटीला महात्मा फुले यांचे नाव देऊन त्यांनी आपल्या सत्यशोधकी विचारांची जपणूक केली. एवढ्यावर न थांबता फोंड्या माळावर सहकारी तत्त्वावर नळपाणी योजना राबवून परिसराच्या विकासाला त्यांनी हातभार लावला.यातून एक गोष्ट स्पष्ट होते—नेता एका दिवसात तयार होत नाही. नेतृत्वामागे संघर्ष असतो, लोकांमध्ये मिसळण्याची वृत्ती असते, त्याग असतो आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे लोकांसाठी काहीतरी करण्याची प्रामाणिक तळमळ असते. दादांच्या नेतृत्वाची पायाभरणी याच मूल्यांवर झाली होती.

नेत्याच्या एका शब्दाला दिलेले आयुष्यभराचे महत्त्व

        १९६२ ची विधानसभा निवडणूक त्यांच्या सार्वजनिक जीवनातील नैतिकतेचे एक विलक्षण उदाहरण ठरले. निवडणुकीचा अर्ज भरण्याची त्यांची तयारी सुरू होती. त्याचवेळी यशवंतराव चव्हाण कोल्हापुरात आले. त्यांनी दादांना सोबत घेतले आणि पन्हाळा परिसरात फेरफटका मारला. त्यावेळी चव्हाण यांनी दादांना अर्ज भरू नये, असे सांगितले. दादांनी कोणतीही कुरबूर न करता निवडणुकीची संपूर्ण तयारी थांबवली.पाच वर्षांनंतर, १९६७ मध्ये पुन्हा विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. कराड येथे काँग्रेसची बैठक सुरू होती. करवीर-कोल्हापूरमधून उमेदवारी मागण्यासाठी कोणीही पुढे आले नसल्याचे लक्षात आल्यानंतर चव्हाण यांनी दादांना तातडीने निरोप पाठवला. काही तासांत दादा कराडला पोहोचले.

      ‘फॉर्म का भरला नाही?’ असा प्रश्न चव्हाण यांनी विचारला.

     दादांचे उत्तर होते—‘पाच वर्षांपूर्वी तुम्ही फॉर्म भरू नका असे सांगितले होते. आतापर्यंत तरी फॉर्म भरा, असे कुठे सांगितले?’ दादांचे हे उत्तर ऐकून चव्हाण भावूक झाले. त्यांनी दादांना जवळ घेतले, आलिंगन दिले आणि अर्ज भरण्यास सांगितले. ही केवळ एका निवडणुकीची आठवण नाही; तर त्या काळातील राजकारणातील विश्वास, शब्दाला असलेले महत्त्व आणि निष्ठेचे दर्शन घडविणारा प्रसंग आहे.

पाच वेळा आमदार, मंत्री; पण सामान्यांचा ‘दादा’च

        कै. श्रीपतराव बोंद्रे दादा पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले. शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी मंत्री म्हणूनही काम केले. मात्र सत्ता आणि पद मिळाल्यानंतरही सामान्य माणूस त्यांच्या आयुष्यातून कधीच दूर झाला नाही. ‘दादा’ म्हणजे मोठा भाऊ. आणि त्यांनी हे नाते केवळ नावापुरते ठेवले नाही. शेतकरी, कष्टकरी, सामान्य नागरिक यांच्याशी मोठ्या भावाच्या आपुलकीने ते वागत. करवीर तालुका, राधानगरी आणि कोल्हापूर शहरातील जनतेशी त्यांचे नाते राजकारणाच्या पलीकडचे होते. त्या काळात आजच्यासारखी मोबाईलची सुविधा नव्हती. फोनची साधनेही मर्यादित होती. त्यामुळे लोक वेळ-अवेळ पाहता दादांना भेटण्यासाठी येत. दादा प्रत्येकाची आस्थेने चौकशी करीत. येणाऱ्या माणसाला चहा दिला जाई. त्याच्या घरची, कुटुंबाची विचारपूस केली जाई. लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचा दरारा होता; पण त्या दराऱ्यामागे माणुसकीची ऊबही होती.

बदलत्या राजकारणाची दादांना होती खंत

             दादांच्या अखेरच्या काळात त्यांच्या सहवासात काही वेळ घालविण्याची संधी मिळाली. त्यांना वर्तमानपत्र वाचून दाखविताना तास-दोन तास संवाद होत असे. त्यांची स्मरणशक्ती अत्यंत तीव्र होती. एखादे नाव विसरले तरी त्यामागचा संदर्भ मात्र त्यांच्या स्मरणात स्पष्ट असे. या संवादातून त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा मोठा पट उलगडत असे.  काळ बदलला. राजकारणाचे स्वरूप बदलले. सेवाभावापेक्षा सत्तेला महत्त्व मिळू लागले. पैशाचा वापर वाढला. ‘समाजकारणासाठी राजकारण’ हे सूत्र मागे पडत असल्याची खंत दादांच्या बोलण्यातून जाणवत असे. वेगळे मत मांडले की शत्रुत्व निर्माण होणे, राजकीय विरोधकांमधील संवाद कमी होणे आणि पराभूत उमेदवाराने विजेत्याचे अभिनंदन करण्याची संस्कृती लोप पावणे, याबद्दल त्यांना विशेष दुःख वाटत असे. त्यांच्यासाठी राजकारण म्हणजे केवळ सत्ता नव्हती; राजकारण म्हणजे समाजसेवेचे माध्यम होते.

शेवटपर्यंत पुढच्या पिढीची चिंता

               १९९५ नंतर त्यांनी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली. वयाच्या पंचाहत्तरीनंतर शरीर थकले होते; मात्र मन मात्र समाज आणि आपल्या माणसांमध्येच रमलेले होते. पुढच्या पिढीचे काय चालले आहे, याची त्यांना कायम उत्सुकता होती. चंद्रकांतदादा, पी. एन. साहेब यांच्या राजकीय भवितव्याबद्दल ते विचारपूस करीत. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे कामकाज कसे सुरू आहे, याचीही त्यांना काळजी होती.आज त्यांच्या निधनाला २६ वर्षे झाली आहेत. काळ पुढे गेला, पिढ्या बदलल्या, राजकारण बदलले; पण दादांच्या आठवणी मात्र ताज्याच आहेत. त्यांनी प्रेमाने ‘गुरुजी’ म्हणून घातलेली हाक आजही मनाला हळवे करते. अनेक नेते आले, अनेक नेते पुढे येतील. मात्र मातीशी नाते सांगणारे, कष्टकऱ्यांच्या वेदना समजून घेणारे, सत्तेपेक्षा सेवेला महत्त्व देणारे आणि सर्वसामान्यांना मोठ्या भावाप्रमाणे आधार देणारे श्रीपतराव बोंद्रे दादा हे एक वेगळेच पर्व होते.     त्यांच्या जीवनाकडे पाहिले की जाणवते—पद मोठे असणे महत्त्वाचे नाही; त्या पदावर असताना माणुसकी किती मोठी ठेवली, हे महत्त्वाचे असते.कै. श्रीपतराव बोंद्रे दादांनी आपल्या कार्यातून हाच आदर्श समाजासमोर ठेवला.

                त्यांच्या कार्याचे स्मरण, त्यांच्या विचारांचा जागर आणि त्यांनी जपलेल्या नैतिक मूल्यांची जपणूक—हीच त्यांच्या पवित्र स्मृतींना खरी आदरांजली!

                                                                                                                                                                                         – प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर