तरुण पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविणे काळाची गरज: पालकमंत्री प्रकाश आबिटकर

माणसाच्या वैचारिक प्रगतीसाठी वाचन महत्वाचे: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, चंद्रकांत पाटील

कोल्हापूर: रेणू पोवार

दि.१५: आजची तरुण पिढी विविध कारणांमुळे वाचनापासून दुरावली असली तरी ग्रंथांचे महत्त्व सदैव कायम राहणार आहे. त्यामुळे युवा पिढीमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. 

महाराष्ट्र शासनाचा उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गारगोटी येथील श्री इंजुबाईदेवी सांस्कृतिक भवन येथे दोन दिवसीय ‘कोल्हापूर ग्रंथोत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या सांगता समारंभावेळी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, माजी आमदार तथा श्री शाहू वाचनालयाचे अध्यक्ष बजरंग आनंदराव देसाई, कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुशांत मगदूम, प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वाईकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. आबिटकर पुढे म्हणाले की, तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करून गावागावात वाचन चळवळ व्यापक करणे गरजेचे आहे. या कार्यासाठी कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय कार्यालयास जागा उपलब्ध करून दिली जाईल, तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून जिल्ह्यातील ग्रंथालयांना आवश्यक निधीही पुरवला जाईल. ग्रंथालय चळवळ गतिमान करण्यासाठी सर्वांनी सामाजिक जबाबदारी म्हणून प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील म्हणाले की, माणसाच्या वैचारिक प्रगतीसाठी पुस्तकांचे वाचन अनिवार्य आहे. वाचनामुळे माणूस विचारप्रवृत्त होतो आणि जीवनात यशस्वी होतो. वाचन संस्कृती समृद्ध न झाल्यास

ज्ञानापासून आपण वंचित राहू. जिल्ह्यातील ग्रंथालयांच्या सक्षमीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यासोबतच जिल्हा ग्रंथालय कार्यालयासाठी नवीन सुसज्ज इमारत उभी करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. तत्पूर्वी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ग्रंथोत्सवात लावलेल्या विविध ग्रंथ दालनांना (स्टॉल्सना) भेट देऊन पाहणी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर यांनी केले, तर आभार जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुशांत मगदूम यांनी मानले.