सातगाव मंडळाकडून भैरवगड भैरवनाथ यात्रेची जय्यत तयारी; १८ मार्च रोजी विविध कार्यक्रमांची रेलचेल

आरवली: नियाझ खान 
दि.१७: सातारा–रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेल्या भैरवगड येथील श्री भैरवनाथ मंदिराची वार्षिक यात्रा बुधवार, दिनांक १८ मार्च २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सातगाव मंडळाकडून यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.भैरवगड हे धार्मिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. डोंगरकड्यावर वसलेल्या या देवस्थानाला सातारा व रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमधून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यात्रेनिमित्त सकाळी ११ वाजता देवाला रूप लावून धार्मिक विधींना सुरुवात होणार असून दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराची स्वच्छता, रस्त्यांची दुरुस्ती, पाणी व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम मंडळाकडून सुरू आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सातगाव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

यंदाच्या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. युवक-युवतींना आपले कलागुण सादर करण्याची संधी या स्पर्धेतून मिळणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांनी सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन पाटोळे यांच्याशी संपर्क साधावा.📞 मो. नं. 9922749187