सांगली: अय्यान पटेल
दि.७: गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर प्रभावी प्रतिबंध घालण्याच्या दृष्टीने एचपीव्ही लसीकरण मोहीम महत्त्वाची आहे. भविष्यात होणाऱ्या संभाव्य धोक्यांपासून महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे एक प्रभावी कवच ठरणार आहे. यामध्ये १४ वर्षे पूर्ण झालेल्या, परंतु १५ वर्षे पूर्ण न झालेल्या वयोगटातील मुलींना ‘गार्डसिल-४’ या लसीचा एक मोफत डोस देण्यात येत आहे. विविध माध्यमांतून जिल्ह्यातील १४ ते १५ वर्ष वयोगटातील प्रत्येक मुलीपर्यंत व त्यांच्या पालकापर्यंत पोहोचून त्यांना लसीकरणाचे महत्व समजावून सांगावे. याबाबत कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, काही शंका असल्यास अधिकृत वैद्यकिय व्यवसायिकांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी आज येथे केले.
एचपीव्ही व राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणाच्या अनुषंगाने स्थापित जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. छाया पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव पाटील, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक यांच्यासह आरोग्य विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, एचपीव्ही लसीकरण पूर्णपणे मोफत व पालकांच्या संमतीने ऐच्छिक स्वरूपात आहे. याबाबात शाळांमध्ये तसेच अन्य माध्यमातून अधिकाधिक जनजागृती करावी. लसीकरणासाठी कॅम्पचे आयोजन करून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे. ज्या ठिकाणी कमी लसीकरण झालेले आहे त्या तालुक्यातील तालुका आरोग्य अधिकारी यांनी लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. यासाठी आरबीएसके पथकांचीही मदत घ्यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती व प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांनी या लसीकरण मोहिमेबद्दल सविस्तर माहिती दिली. एचपीव्ही लस सुरक्षित असून, सर्व पालकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या १४ वर्षांच्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे, याबाबत प्रयत्न व जनजागृती करण्याबाबत सूचित करण्यात आले. तसेच राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम दि. २८ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आली असल्याचे सांगून यासाठी जिल्ह्यात २ लाख ४७ हजार १७३ लाभार्थी असून १ हजार ९४० बूथवर ५ हजार २४आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही मोहिम यशस्वी करण्याचे नियोजन केले असल्याचे सांगितले.