सातबारा नोंदीसाठी ६० हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारीसह खासगी व्यक्ती जाळ्यात

कोल्हापूर: प्रतिनिधी

दि.२५: सातबाऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. ही कारवाई १८ मे रोजी शिरोळ तालुक्यात करण्यात आली.
या प्रकरणातील आरोपींमध्ये नृसिंहवाडी येथील मंडळ अधिकारी तथा नांदणीचा अतिरिक्त कार्यभार असलेले अमितकुमार जगन्नाथ पाडळकर (वय ४४) आणि खासगी व्यक्ती शिवाजी आनंदराव जाधव (वय ६१, रा. धरणगुत्ती, ता. शिरोळ) यांचा समावेश आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, कोर्टाच्या हुकूमनाम्यानुसार सातबाऱ्यावर नाव नोंद करण्यासाठी आरोपींकडून १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी करताना आरोपींनी तडजोडीअंती ६० हजार रुपये स्वीकारण्याचे ठरवल्याचे निष्पन्न झाले.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. मंडळ अधिकारी अमितकुमार पाडळकर यांनी तक्रारदारास ६० हजार रुपये खासगी व्यक्ती शिवाजी जाधव यांच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारताच पथकाने तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले.या प्रकरणी Maharashtra Anti Corruption Bureau च्या पथकाने कारवाई केली असून शिरोळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ व ७-अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून तपास पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील करीत आहेत.