शिवाजीनगर पोलिसांची विशेष प्रतिबंधक मोहीम; १९३ आरोपींवर कारवाई

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी 

दि .६: कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली इचलकरंजी उपविभागातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याने गुन्हेगारांविरुद्ध विशेष प्रतिबंधक कारवाई मोहीम राबवून १९३ आरोपींवर कारवाई केली. तसेच वॉरंटमधील ७ आरोपींना अटक करून त्यापैकी २ आरोपींना कारागृहात पाठविण्यात आले.पोलीस अधीक्षक कोल्हापूर व अपर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम आयोजित करण्यात आली. इचलकरंजी उपविभागातील इचलकरंजी, शिवाजीनगर, हातकणंगले, हुपरी आणि राधानगरी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करणे आणि गुन्हे प्रतिबंधित करणे हा मोहिमेचा मुख्य उद्देश होता.


उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या सूचनेनुसार विविध पोलीस ठाण्यांकडून मोका गुन्ह्यातील आरोपी, दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेले सराईत गुन्हेगार, जेलमधून सुटलेले आरोपी, हिस्ट्रीशीटर, गँग हिस्ट्रीशीटर, वॉरंटमधील आरोपी, अमली पदार्थ विक्रीशी संबंधित आरोपी तसेच इतर गुन्ह्यांतील आरोपी अशा एकूण १६२ रेकॉर्डवरील आरोपींना मोहिमेत हजर करण्यात आले.
या आरोपींची सविस्तर माहिती संकलित करून त्यांना चांगल्या वर्तनाबाबत सूचना देण्यात आल्या. गुन्हेगारी प्रवृत्तीत सुधारणा करून कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी आवश्यक समुपदेशनही करण्यात आले.

या विशेष मोहिमेदरम्यान एकूण १९३ आरोपींवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. वॉरंटमधील ७ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यापैकी २ आरोपींना न्यायालयीन आदेशानुसार कारागृहात पाठविण्यात आले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.