इचलकरंजी: विजय मकोटे
दि.२६: इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने सालाबादप्रमाणे कर्नाटकी बेंदूर उत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या बैल पळविणे स्पर्धेत लहान गटात राकेश कलगाेंडा पाटील यांच्या बैलाने 28 सेकंद 9 पाॅईंट अशी वेळ नाेंदवत प्रथम क्रमांक पटकविला.
इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घाेरपडे यांच्या काळापासून काळापासून या स्पर्धा भरविल्या जात असून यंदाचे हे 121 वे वर्ष आहे. डीकेटीई नारायण मळा प्रशालेच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेचा शुभारंभ सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते आणि बाबासाे राजमाने व अरुण काशिद यांच्या प्रमुख उपस्थितीत मैदानाचे पुजन करुन करण्यात आला. लहान गटातील या स्पर्धेत 32 स्पर्धक सहभागी झाले हाेते. मैदान पाहण्यासाठी तरुणांसह नागरिकांनी माेठी गर्दी केली हाेती.
या स्पर्धेत राकेश कलगाेंडा पाटील -प्रथम (28 सेकंद 9 पाॅईंट), विनायक अनिल म्हेत्रे -द्वितीय (30 सेकंद 8 पाईंट) तर दस्तगीर शाैकत मुजावर – तृतीय (31 सेकंद 7 पाईंट) यांच्या बैलांनी क्रमांक मिळवले. याप्रसंगी उत्तम आवाडे, प्रकाश दत्तवाडे, देवांशिष पाटील, शिवांशिष पाटील, बेंदूर कमिटीचे अध्यक्ष बाळासाे कलागते, अहमद मुजावर, नंदु पाटील, शांताप्पा मगदूम, राहुल घाट, सुभाष जाधव, राजू बचाटे, तानाजी काेकितकर, किशाेर पाटील, सागर गळदगे, डाॅ. विजय माळी, राजू दरीबे, शिवाजी काळे यांच्यासह शर्यतप्रेमी उपस्थित हाेते.