बेकायदेशीररीत्या मेफेन्टरमिन सल्फेट इंजेक्शनची विक्री करणारा जेरबंद; ३०,५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी 

दि. १४ : शिवाजीनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने बेकायदेशीररीत्या मेफेन्टरमिन सल्फेट (टर्मिन) इंजेक्शनची विक्री करणाऱ्या एका संशयिताला अटक करून त्याच्याकडून ३० हजार ५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सदाम गजबर सनदी यांनी फिर्याद दिली असून, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १२३, १२५ व २७६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, यशवंत कॉलनी ते पाटील मळा जाणाऱ्या रस्त्यावर, कबनूर (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे एक व्यक्ती मेफेन्टरमिन सल्फेट इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार १३ जुलै रोजी सापळा रचून पोलिसांनी निखिल शंकर पाटील (वय २३, रा. यशवंत कॉलनीजवळ, पाटील मळा, कबनूर) याला ताब्यात घेतले.
त्याच्या ताब्यातील पिशवीची झडती घेतली असता मेफेन्टरमिन सल्फेट ((टर्मिन) इंजेक्शनच्या १० मिलीच्या ५१ सीलबंद काचेच्या बाटल्या आढळून आल्या. प्रत्येक बाटलीची किंमत ३०४ रुपये असून त्यांची एकूण किंमत १५,५०४ रुपये आहे. तसेच डिनो कंपनीचा काळ्या रंगाचा मोबाईल हँडसेट (किंमत १५ हजार रुपये) असा एकूण ३०,५०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चौकशीदरम्यान आरोपीकडे सदर इंजेक्शन जवळ बाळगण्याचा परवाना अथवा डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन नसल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय अधिकाऱ्यांची परवानगी नसताना काळ्या बाजारात विक्रीसाठी ही इंजेक्शने बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची  कारवाई पोलीस अधीक्षक श्री .निलोत्पलसो अपर पोलीस अधीक्षक आण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शरद मेमाणे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलीस अंमलदार सदाम सनदी, गणेश सनदी, शिरीष कांबळे, तुषार सूर्यवंशी, प्रमोद चव्हाण, विकास चोंगुले तसेच महिला पोलीस अंमलदार मनीषा माळी यांनी केली.
आरोपीला अटक करण्यात आली असून, गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण करीत आहेत.