इचलकरंजीतील होड्यांच्या शर्यतीत कवठेसारचा युवाशक्ती बोट क्लब प्रथम

इचलकरंजी: एजाज मुजावर 
दि.८ : इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने क्रांती दिना निमित्त आयोजित होड्यांच्या शर्यतीत कवठेसारच्या युवाशक्ती बोट क्लबने प्रथम क्रमांक मिळवला. तर डिग्रज बोट क्लब डिग्रजने दुसरा, सांगलवाडीच्या तरुण मराठा बोट क्लबने तिसरा आणि कवठेसारच्या हजरत सय्यद बादशाह बोट क्लबने चौथा क्रमांक मिळविला. स्पर्धेनंतर आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.


इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधत मागील ३६ वर्षांपासून सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे याच्या मार्गदर्शनाखाली पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यती घेतल्या जात आहेत. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही शर्यतीला प्रतिसाद मिळून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील १०  बोट क्लबने सहभाग नोंदविला होता. शर्यतीचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पाण्याला असलेला वेग आणि त्यातून शर्यतीमध्ये निर्माण झालेली चुरस पाहून प्रेक्षकांकडून सर्वांना प्रोत्साहन दिले जात होते. पंचगंगा नदीच्या दोन्ही काठावर तसेच लहान व मोठ्या पुलावर शर्यत शौकिनांनी तसेच महिलांनीही मोठी गर्दी केली होती. प्रथम क्रमांकासाठी देण्यात येणारी चांदीची फिरती गदा मध्यवर्ती सहकारी हातमाग विणकर संघाचे चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांच्यातर्फे देण्यात आली आहे. तर कै. इलाई कलावंत यांच्या स्मरणार्थ राजू कलावंत व इम्रान कलावंत यांच्या वतीने शिल्ड देण्यात आले.
याप्रसंगी महापौर उदय धातुंडे, स्थायी सभापती सतिश मुळीक, पोलिस निरिक्षक शरद मेमाणे, शेखर शहा, नगरसेवक सुशांत कलागते, अभिषेक वाळवेकर, राजू बोंद्रे, पापालाल मुजावर, अनिकेत पाटील, नरसिंह पारीक यांच्यासह इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते, उपाध्यक्ष नंदु पाटील, अहमद मुजावर, शांताप्पा मगदूम, राहुल घाट, शिवाजी काळे, तानाजी कोकितकर, सागर गळदगे, शिवाजी माळी, सागर मगदूम, डॉ. विजय माळी, श्रीकांत कगुडे, राजू दरिबे, सागर कम्मे, असिफ मुजावर, विनायक म्हेत्रे, अभिजित बचाटे, राजू माळी, गणेश बरगाले, इरफान अत्तार, वसीम बागवान, अरिफ आत्तार आदींसह मान्यवर व शर्यत शौकिन उपस्थित होते. सूत्रसंचालन सुहास माळी यांनी केले.