सहायक पोलीस निरीक्षक इम्रान नायकवडे यांना उत्कृष्ट सेवा पदक

कबनूर : सलीम मुल्ला 

दि.१७: महाराष्ट्र पोलीस दलात निष्कलंक, मोलाची आणि उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल गुन्हे शाखा, अमरावती शहर येथे कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक इम्रान नायकवडे यांची केंद्रीय गृह मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या ‘उत्कृष्ट सेवा पदका’साठी निवड झाली आहे. दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित शासकीय कार्यक्रमात त्यांना हे पदक प्रदान करण्यात आले .

              इम्रान नायकवडे यांची सन २००६ मध्ये पोलीस शिपाई म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाली. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन २०१० मध्ये घेण्यात आलेली पोलीस उपनिरीक्षक (PSI) परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली. सन २०१३ पासून त्यांनी मुंबई शहर पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून सुमारे नऊ वर्षे उल्लेखनीय सेवा बजावली.

          मुंबई शहरातील सेवाकाळात त्यांनी दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब याच्याशी संबंधित अतिमहत्त्वाच्या विशेष न्यायालयीन खटल्यात विशेष सरकारी अभियोक्त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी पार पाडली. तसेच गुंडाविरोधी पथक आणि वाहन चोरीविरोधी पथकात कार्यरत असताना खून, खंडणी, बलात्कार, वाहन चोरी तसेच अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींचा शोध घेण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

           दहशतवादविरोधी कक्षात कार्यरत असताना त्यांनी बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केलेल्या १४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. या सर्व आरोपींना न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित नागरिकांना बांगलादेशात परत पाठविण्यात आले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुंबई विशेष शाखेच्या अपर पोलीस आयुक्तांनी त्यांना विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरविले.

           याशिवाय त्यांनी महत्त्वाच्या खंडणीच्या गुन्ह्यांचा तपास करून आरोपींना सत्र न्यायालयाकडून शिक्षा होण्यासाठी प्रभावी तपास केला. संबंधित आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (MCOCA) कारवाई करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

            सन २०२१ मध्ये मुंबई शहरातून अमरावती शहर येथे पोलीस उपनिरीक्षक पदावरून सहायक पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाल्यानंतर त्यांची बदली झाली. अमरावती शहरात आर्थिक गुन्हे शाखेसह विविध ठिकाणी त्यांनी कार्यरत राहून उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील निष्कलंक सेवा, गुन्हे तपासातील कौशल्य, धाडसी कामगिरी आणि कर्तव्याप्रती असलेली निष्ठा याची दखल घेत त्यांची उत्कृष्ट सेवा पदकासाठी निवड करण्यात आली आहे.सहायक पोलीस निरीक्षक इम्रान नायकवडे यांच्या या गौरवामुळे अमरावती शहर पोलीस दलासह त्यांच्या सहकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.