कोल्हापूर: प्रवीण भोसले
दि .२८ मानसिक आरोग्य, भावनिक तंदुरुस्ती आणि विवेकी विचार याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ स्मार्ट सिटी कोल्हापूर, रोटरी क्लब ऑफ होरायझन कोल्हापूर आणि रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच रोटरी समाजसेवा केंद्र संचलित प्रेरणा कौन्सिलिंग सेंटरच्या सहकार्याने आयोजित ‘विवेकी – An Emotional Fitness Training’ या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रोटरी समाजसेवा केंद्र येथे आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम हाऊसफुल झाला. सभागृहात उपस्थितांची मोठी गर्दी झाली होती.
कार्यक्रमात मानसोपचारतज्ज्ञ व प्रशिक्षक रोहन पांडे यांनी CBT (Cognitive Behaviour Therapy) आणि REBT (Rational Emotive Behaviour Therapy) या पद्धती अत्यंत सोप्या व व्यावहारिक पद्धतीने समजावून सांगितल्या. प्रेसिडेंट रो. सोनल जोशी यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून उपस्थितांच्या मनातील विविध प्रश्न रोहन पांडे यांच्यासमोर मांडण्यात आले. या प्रश्नांना त्यांनी उदाहरणांसह दिलेल्या प्रभावी उत्तरांमधून विचार, भावना आणि वर्तन यांचा परस्परसंबंध स्पष्ट केला. तसेच नकारात्मक व अविवेकी विचार अधिक वास्तववादी आणि विवेकी विचारांनी कसे हाताळता येतात, याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन मिळाले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रो. विक्रांतसिंह कदम-DGN यांनी आपल्या भाषणातून कार्यक्रमात मांडण्यात आलेल्या विविध मुद्द्यांचा ऊहापोह केला. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्य आणि भावनिक तंदुरुस्तीविषयक अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास असिस्टंट गव्हर्नर रो. डॉ. मेघराज चूघ यांच्यासह विविध रोटरी क्लबचे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर्स, पास्ट प्रेसिडेंट्स, पदाधिकारी व सदस्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे, कराड येथूनही अनेक नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. तसेच एक दिवस आधी इचलकरंजी येथे झालेल्या याच कार्यक्रमास उपस्थित राहता न आलेल्या अनेकांनी कोल्हापुरातील कार्यक्रमास आवर्जून हजेरी लावली. रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतरही वाढती उपस्थिती लक्षात घेऊन मागील छोटा हॉलदेखील खुला करण्यात आला. काही उपस्थितांनी उभे राहून संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेतला. या उत्स्फूर्त प्रतिसादातून मानसिक आरोग्य आणि भावनिक तंदुरुस्ती यांसारख्या विषयांवर समाजात मोकळ्या संवादाची वाढती गरज अधोरेखित झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रेसिडेंट रो. सोनल जोशी यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्रेसिडेंट रो. सागर बकरे यांनी करून दिला. आभार प्रेसिडेंट रो. किरण पोवार यांनी मानले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयपीपी रो. अभिजित पिंपळकर यांनी केले. स्वागत व रजिस्ट्रेशनची जबाबदारी रो. राजेंद्र जोशी व रो. प्रमोद सूर्यवंशी यांनी सांभाळली.