इचलकरंजी: अन्वर मुल्ला
दि.२ :अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करून तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करणे, जबरदस्तीने खांद्यावर हात ठेवणे तसेच कॉफी व चित्रपटाला जाण्याचा आग्रह करून तिच्यासोबत फोटो काढल्याप्रकरणी इचलकरंजी पोलिसांनी एका २० वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाहिद जमीर नांदणीवाले (वय २०, रा. झेंडा चौक, गावभाग, इचलकरंजी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी १७ वर्षांची असून ती इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत आहे.
दि. २६ ऑगस्ट रोजी चाटे एज्युकेशन, भगतसिंग बाग परिसर, दि. २९ ऑगस्ट रोजी वर्षा फिटनेस, आर. के. टॉकीज बेसमेंटजवळ तसेच दि. ३१ ऑगस्ट रोजी वर्धमान चौक येथे आरोपीने अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीला मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही त्याने तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला. तसेच जबरदस्तीने खांद्यावर हात ठेवून कॉफी घेण्यासाठी व चित्रपट पाहण्यासाठी जाण्याचा आग्रह केला आणि तिच्यासोबत फोटो काढून मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ७५(२), ७८, १२६(२) तसेच बाल लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO), २०१२ मधील कलम ८ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्यात मोटारसायकलचा वापर झाल्याचे नमूद आहे.
गुन्हा १ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७.३८ वाजता दाखल करण्यात आला. पुढील तपास मपोउपनिरीक्षक मृणालिनी पाटील करीत आहेत. गुन्हा दाखल करण्याची कारवाई मसपोनि माने यांनी केली