पूर्वीप्रमाणे ‘सूत बाजार’ छ. शिवाजी महाराज उद्यान येथे सुरु कारणेसाठी दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचा पुढाकार

इचलकरंजी : हबीब शेख दर्जी 

दि.१५: सध्या बंद असलेला इचलकरंजी येथील छ. शिवाजी महाराज उद्यानातील ऐतिहासिक ‘सूत बाजार’ पूर्ववत सुरू करणेसंदर्भातील निवेदन दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या वतीने यार्न मर्चन्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीपकुमार केडिया यांना देणेत आले.छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील सूत बाजार म्हणजे इचलकरंजीच्या वस्त्रोद्योगाची जुनी व अत्यंत विश्वासार्ह परंपरा राहिली आहे. दररोज दुपारी दोन तासांसाठी भरणाऱ्या सूत बाजारात सूत व्यापारी, यंत्रमागधारक आणि सूत दलाल थेट समोरासमोर येत असत. यामुळे कोणत्या व्यापाऱ्याकडे कोणत्या दर्जाचे (क्वालिटीचे) सूत उपलब्ध आहे, सायझिंगवर चालायला कसं आहे, त्याचे चालू बाजारभाव काय आहेत, त्याचबरोबर दुसऱ्या कारखानादारांना तेच सूत कुठल्या दरानं घेतलेलं आहे. याची अचूक व थेट माहिती यंत्रमागधारकांना विनाविलंब मिळत असे. या नियमित भेटीगाठींमुळे माहितीची देवाणघेवाण गतिमान होऊन बाजारात विश्वासाचे वातावरण टिकून होते.

सध्या हा प्रत्यक्ष बाजार बंद असल्याने यंत्रमागधारकांची मोठी गैरसोय होत आहे. थेट संवादाची जागा नष्ट झाल्याचा गैरफायदा काही अपप्रवृत्तीचे दलाल घेत आहेत. परस्पर सूत अंगावर घेणे तसेच विविध क्लृप्त्या वापरून सूत व्यापारी आणि यंत्रमागधारकांची फसवणूक करण्याचे प्रकार अलीकडच्या काळात निदर्शनास आले आहे. यामुळे प्रमाणिक सूत व्यापारी व यंत्रमागधारक यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत असून बाजारातील विश्वासाला तडे जात आहेत.

खुला सूत बाजार पुन्हा सुरू झाल्यास बाजारातील सुताचे दर आणि मालाची उपलब्धता याविषयी पूर्ण पारदर्शकता येईल. कोणाकडे कुठलं आणि किती बाचके शिल्लक आहेत याची माहिती मिळेल. तसेच काही सूत दलाल रेट वाढवून वगैरे देतात किंवा अंगावरती सूत बुकिंग करून कारखानदारांना देण्याचे प्रकार करतात. या सर्वांना आळा बसेल आणि एक पारदर्शक सूत मार्केट सर्वांना मिळेल. जे सूत व्यापारी प्रामाणिकपणे व्यवसाय करतात, त्यांना या बाजाराचा मोठा लाभच होईल आणि फसवणूक करणाऱ्या अपप्रवृत्तींना आपोआप आळा बसेल. यासाठी दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने पुन्हा सूत बाजार सुरु व्हावा यासाठी पुढाकार घेतला आहे. दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशन सूत व्यापारी, यंत्रमागधारक व सूत दलालांना असे आवाहन करत आहे कि, सर्वांनी या सूत बाजारामध्ये उपस्थित राहून दररोज सूत बाजार भरेल व यशस्वी होईल यासाठी सहकार्य करावे.यावेळी अध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपाध्यक्ष रफिक खानापुरे, संचालक पांडुरंग सोलगे, किरण पोवार, दत्तात्रय टेके, राजाराम गिरी उपस्थित होते.

सूत व्यापारी, यंत्रमागधारक व सूत दलाल यांना आवाहन –

सूत व्यापारी, यंत्रमागधारक  व सूत दलाल यांनी पूर्वीप्रमाणे दुपारी दोन तासांसाठी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथे येऊन बंद केलेला सूत बाजार पुन्हा सुरु करणेसाठी दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन सहकार्य करावे असे आवाहन दि इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.