वाचन हे आनंदी, समृद्ध जगण्याचे साधन : प्रा.निशांत गोंधळी

शहाजी महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन विविध उपक्रमांनी साजरा

कोल्हापूर : प्रवीण भोसले 

दि.१६: चांगल्या पुस्तकांचे वाचन केल्याने मानवी जीवन समृद्ध व आनंददायी होते. त्यामुळे लेखक, साहित्यिक, विचारवंत यांचे चांगले साहित्य तरुणांनी वाचावे व आपले जीवन समृद्ध करावे असे आवाहन सुप्रसिद्ध निवेदक, कवी, व्याख्याते प्रा. निशांत गोंधळी यांनी केले. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील शिवाजी ग्रंथालय व सर्व विभागांच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिनानिमित्त विशेष व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. वाचू आनंदे हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के. शानेदिवाण व्याख्यानाच्या अध्यक्षांनी होते. कोल्हापुरातील गुणीदास फाउंडेशन, निर्धार संस्था व अक्षर दालन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित केला होता.


यावेळी वंदे मातरम गीतास 150 वर्षे पूर्ण झाल्या निमित्त, त्याच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त वंदे मातरम समग्र लेखाचे यावेळी सामुदायिक वाचन करण्यात आले. डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्यावरील ग्रंथसंपदेचे ग्रंथ प्रदर्शन तसेच विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकांचे ग्रंथ परीक्षणाचे भिंती पत्रक यावेळी प्रदर्शित करण्यात आले. प्रारंभी भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.  श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
स्वागत व प्रास्ताविक ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी केले. सूत्रसंचालन व आभार डॉ.रचना माने यांनी मानले. यावेळी समृद्धी बाबासाहेब गुरव ,तेजस्विनी साहेबांना रोहिदास, अमृता भीमराव कांबळे या विद्यार्थिनींचा अग्निपंख हे पुस्तक देऊन गौरव करण्यात आला.गुणीदास फाउंडेशन चे संचालक सुधर्म जामसांडेकर , श्री दर्शन शिपुरकर, डॉ.ए.बी.बलुगडे,डॉ.के एम देसाई, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .सौ. यु. यु .साळोखे, सौ. मंजिरी भोसले, सुहास टिपुगडे व प्रशासकीय सहकार्यानी या विविध उपक्रमांचे संयोजन केले.