त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवातून ‘पाणी वाचवा – देश वाचवा’चा संदेश

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सवातून ‘पाणी वाचवा – देश वाचवा’चा संदेश

सांगली : मयुरी देशपांडे 

दि .२७:  सूरज फौंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल, विजयनगर, म्हैसाळ आणि श्री स्वामी समर्थ मंदिर कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शेडबाळ रोड, म्हैसाळ येथे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव आणि ‘पाणी वाचवा – देश वाचवा’ या जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दीपोत्सवाच्या माध्यमातून जलसंवर्धनाचा सामाजिक संदेश देण्यात आला.कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे परमपूज्य आदिनाथ महाराज (सुभाषनगर) यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी शाळेचे मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक सुनील चौगुले आणि मुख्याध्यापिका सौ. बबिता कांबळे यांच्या हस्ते मंदिर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

      मुख्याध्यापक सुनील चौगुले यांनी उपस्थितांचे स्वागत करत त्रिपुरारी पौर्णिमेचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व विशद केले. तसेच पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन असून त्याचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगत ‘पाणी वाचवा – देश वाचवा’ हा संदेश दिला.यावेळी श्री स्वामी समर्थ मंदिर कमिटीचे पदाधिकारी मेघबाळ शिंदे (म्हैसाळकर), भजनी मंडळाच्या अध्यक्षा शिलाताई वनमोरे, बाळ भोसले, शशिकांत कदम, वसंत खांडेकर, मुख्याध्यापिका बबिता कांबळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंदिर कमिटीच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती, पालखी सोहळा आणि सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडला. दीपोत्सवाच्या निमित्ताने उपस्थितांनी जलसंवर्धनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला.या उपक्रमासाठी सूरज फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण लुंकड, सचिव श्रीशैल मोटगी आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले.