रत्नागिरी: अस्लम खान
दि.28:- ऑनलाईन सातबारा, गाव नमुना आठ आणि ऑनलाईन फेरफार आता सेतू केंद्रात उपलब्ध होणार आहे. सेतू केंद्रातून ऑनलाईन सात बारा देणारा रत्नागिरी हा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे. आज रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील सेतू केंद्रामध्ये अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते या ऑनलाईन नमुने मिळणाऱ्या खिडकीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी तहसिलदार शशिकांत जाधव, नायब तहसिलदार संजय खेडसकर, मंडळ अधिकारी सुनिल कीर, उपचिटणीस शाखेचे सुरेंद्र भोजे, सॉफ्टवेअर इन्स्टॉलिग हेड दिनेश सोहोनी आदी उपस्थित होते.
नागरिकांना सातबारा सह जमिनीशी संबंधित महत्वाचे कागदपत्र तातडीने मिळण्यासाठी सेतू केंद्रात सातबारा, गावनमुना आठ आणि फेरफार देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. सेतू केंद्रात या नमुन्यांची प्रत्येकी 20 रुपये दराने प्रतही नागरिकांना मिळणार आहे.