इचलकरंजी परिसर मुद्रक संघाचा पारिवारीक कार्यक्रम

इचलकरंजी  : विजय मकोटे  
दि. १० मार्च इचलकरंजी परिसर मुद्रक संघातर्फे मुद्रक दिनानिमित्त मुद्रकांचा पारिवारीक कार्यक्रम व जीवन गौरव पुरस्काराचे वितरण असा संयुक्त कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. हा स्नेहमेळावा सर्वांनाच आनंदोत्सवाची नेमकी प्रचिती देणारा ठरला, मुद्रकांच्या सार्‍या परिवाराचा हा स्नेहमेळावा सजला तो मुलाबाळांसह माता-भगिनींच्या उत्साही सहभागाने.
चालू असलेले ट्रेडल मशिन, कांही स्टॉल्स, प्रशस्त लॉनचा निसर्गरम्य परिसर, सजविलेले भव्य स्टेज, गुटेनबर्गची लोभस प्रतिमा आणि जणू सण-उत्सव साजरा करण्यात आला. मूळातच इचलकरंजी ही वस्त्रनगरी असल्याने, जमलेल्या सार्‍यांचे पारिवारीक नात्यांचे धागे एकमेकांशी अत्यंत कुशलतेने विणण्यात हे सारेजण यशस्वी ठरले. सुरुवातीला माजी अध्यक्ष विनोद मद्यापगोळ यांनी प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील सर्वांची ओळख करून दिली. प्रास्ताविकात सर्वांच्या व्यावसायिक प्रगतीसाठी मुद्रक संघाचा परिवार म्हणजे आपलं कुटूंब या जाणिवेने सर्व सभासदांनी मुद्रक संघाच्या उपक्रमांना योगदान दिले पाहिजे, नूतन अध्यक्ष महादेव साळी यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सांगलीचे कवीवर्य महेश कराडकर यांनी मुद्रकांना काही मार्मिक उदाहरणासह मार्गदर्शन केले. तसेच सांगलीचेच मुद्रक प्रकाश आपटे यांनी उपस्थित मुद्रक परिवारांचे कौतुक केले. गेली दोन वर्षे कोरोना, लॉकडाऊनमुळे तावून सुलाखून निघालेल्या मुद्रण व्यवसायाला आणि मुद्रकांना प्रेरणा आणि नवसंजीवनी देण्याचं काम अशा स्नेहमेळाव्यातून घडलं आहे. त्याचवेळी इचलकरंजी येथील ज्यांची पाचवी पिढीही या मुद्रणक्षेत्रात कार्यरत आहे अशा ऐंशी वर्षीय ज्येष्ठ बायंडर राजाराम पांडुरंग आंबले यांना ’जीवन गौरव’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तर ‘पैठणी साडी’ चा मान सौ. व श्री. पोतदार यांना मिळाला. यावेळी मुलांसाठी मनोरंजनात्मक खेळ, महिलांच्या सूप्तगुणांना वाव देत, पारितोषिकांच्या माध्यमातून प्रोत्साहन देत मुद्रकांच्या कुटुंबासह ’स्नेहोत्सव’ पार पडला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष सीताराम शिंदे, सेक्रेटरी संजय निकम, इव्हेंट चअरमन गणेश वरुटे, खजिनदार कलगोंडा पाटील, संजय आगलावे, दीपक वस्रे, दिनेश कुलकर्णी, संतराम चौगुले, विनोद मद्यापगोळ, नरेंद्र हरवंदे, स्वप्निल नायकवडे, राकेश रुग्गे, सुधाकर बडवे, रणजीत पाटील, दिपक फाटक, शंकर हेरवाडे आणि सर्व सहकार्‍यांनी परिश्रम घेतले.