इचलकरंजी: संजय आंबे
देि.23एप्रिल: सातवा वेतन आयोग फरकाची दोन हप्त्याची रक्कम व सेवानिवृत्त कर्मचार्यांची ग्रॅच्युईट, शिल्लक रजेचा पगार तातडीने आदा करण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक मनोज साळुंखे यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रदीप ठेंगल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. डॉ. ठेंगल यांनी हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची ग्वाही दिली आहे.
मागील दोन वर्षात कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यातून इचलकरंजी कर्मचारीही सुटलेले नाहीत. शासनाकडून दिले जाणारे अनुदान अपुरे असून ते वेळेत मिळत नसल्याने कर्मचार्यांची ससेहोलपट होत आहे. या कर्मचार्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला असला तरी अद्यापही दोन्ही हप्त्याची रक्कम मिळालेली नाही. त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचार्यांना शिल्लक हक्काच्या रजेचा पगार, ग्रॅच्युईटी रक्कम देण्यात आलेली नाही. सफाई कर्मचार्यांसह चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्यांनी पत संस्थांकडून कर्जे घेतलेली आहे. पण त्यांची हक्काची रक्कम मिळत नसल्याचे संस्थांच्या व्याजाचा नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. शिवाय सुट्टीच्या दिवशीही काम केलेल्या कर्मचार्यांना त्यांचा पगार दिलेला नाही. त्यामुळे या कर्मचार्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने कर्मचार्यांची प्रलंबित देणी तातडीने अदा करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, इम्रान मकानदार, अतिरिक्त मुख्याधिकारी केतन गुजर उपस्थित होते