कोल्हापूर : प्रतिनिधी
दि२८:कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो दूध उत्पादक शेतकरी हे गोकुळचे मालक आहेत. उन्हातान्हात राबून गोकुळचे वैभव वाढविणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांशी आमची बांधिलकी आहे. त्यांच्या हिताला प्राधान्यक्रम देत संचालक मंडळ काम करत आहे, सोमवार (ता.२९ऑगस्ट) रोजी होणाऱ्या वार्षिक सभेत सभासदांच्या सगळया प्रश्नांची उत्तरे देऊ, सभासदांचे समाधान होईपर्यंत सभा चालू राहील’असा पलटवार गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केला आहे.‘गोकुळचा विकास आणि विस्तार, दूध उत्पादकांचे हित हे आमच्या कामकाजाचे सूत्र आहे’ या शब्दांत चेअरमन श्री.पाटील यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.
विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना चेअरमन श्री.पाटील म्हणाले,‘संचालक मंडळाने काटकसरीचे धोरण अंगिकारले आहे. काटकसरीचा कारभार करुन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हातामध्ये जादा चार पैसे मिळावेत ही आमची भूमिका राहिली आहे. सत्तातंरानंतर गोकुळमध्ये कामकाज करताना दूध उत्पादकांचे भले चिंतताना म्हैस दूध खरेदी दरात सहा रुपयांची वाढ व गाय दूध खरेदी दरात पाच रुपये केली. निवडणुकीच्या कालावधीत आम्ही जी आश्वासने दिली होती, त्याची पूर्तता केली. आम्ही केवळ बोलणारे नाही तर सभासदाभिमुख कामकाज प्रत्यक्षात आणणारे आहोत. निवडणुकीत जे बोलले ते करुन दाखविले,
चेअरमन यांना अभ्यास आहे कि नाही हे गोकुळच्या दूध उत्पादकांना माहित आहे.यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा गेली चाळीस वर्षे माझ्यावर विश्वास दाखवला आहे. गोकुळच्या माध्यमातून दूध उत्पादकांची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले आहे. त्यांच्या विश्वासाला पात्र राहून पुढेही नेटाने काम करू.गोकुळचा विकास आणि विस्तार, दूध उत्पादकांचे हित हे आमच्या कामकाजाचे सूत्र आहे.” संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये न बोलणा-या,उत्पादक हिताचे कोणतेही विषय न मांडणा-या संचालिका यांनी त्यांना मान्य नसणा-या प्रश्नाला मिटिंगमध्ये कधीही विरोध केलेला नाही. उगीच संभासदाची दिशा भूल करू नये व सवंग लोकप्रियेतसाठी पत्रक बाजी करून प्रसिध्दी मिळवण्याचा प्रयत्न करू नये. तुमचे प्रश्न अभ्यास पुर्वक आहेत का ते तुम्ही तपासून पाहावे ?
कोरोनासारखी जागतिक महामारी उद्भवलीहोती. या संकटकाळातही गोकुळची कामगिरी प्रभावी राहिली, हे तर इतर दूध संस्थाही मान्य करतात. गोकुळचा जो नावलौकिक आहे त्याचे सारे श्रेय हे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आहे.सभासदांना गोकुळ विषयी, कामकाजाविषयी, नवीन योजनेबद्दल विचारण्याचा हक्क आहे. सभासदांनी जे जे प्रश्न विचारले आहेत त्या साऱ्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्याची आमची तयारी आहे. सभासदांच्या प्रश्नांना बगल देण्याचा प्रयत्न आम्ही कधीच केला नाही. साऱ्यांना सोबत घेउन कामकाज करण्याची आमची पद्धत आहे,राजकीय द्वेषातून व्यक्तीगत आरोप करणे चूकीचे आहे आम्हालाही ही त्यापध्दतीने आरोप करावे लागतील हे टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे.” असा टोलाही चेअरमन पाटील यांनी विरोधकांना लगाविला.