संगमेश्वर:
संगमेश्वर मधील प्रसिद्ध श्री.गणेश मूर्तिकार श्री.संदेश मनोहर शिवलकर व सुशील मनोहर शिवलकर यांच्या चित्र शाळेत 90वर्षे पूर्ण झाली असून यंदा 2022 या देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात 91व्या वर्षात पदार्पण झाले आहे.सुरुवातीला नावडी पोस्ट आळी येथील प्रसिद्ध गणेश मूर्तिकार कै. तुकाराम वासुदेव शिवलकर यांनी 11 गणपती मूर्ती काढून,शाडू माती काम व नैसर्गिक रंगाने सुरुवात केली.त्यानंतर हे गणेश मूर्तिकाम पुढील काळात सामाजिक व संस्कृतीक कार्यकर्ते कै.मनोहर तुकाराम शिवलकर यांनी अत्यंत आवडीने 50 वर्षापेक्षा जास्त काळ केले.
त्यानंतर हे समाज प्रिय व्यक्तिमत्व निवर्तल्यांनतर पुढे त्यांचे मोठे पुत्र संदेश मनोहर शिवलकर व सुशील,अजय,अमोल यांनी सांभाळले आहे. त्या कामात त्यांची पत्नी,मुले तसेच मित्र मंडळींची मोलाची साथ मिळत आहे.काही वर्षांपूर्वी संदेश मनोहर शिवलकर हे उत्तम,कुशलतेने हाती गणपती बनविण्यात उत्कृष्ट कलाकार म्हणून नावारूपास आले.त्यांनी तेर्ये बुरंबी येथे स्वतःचा वेगळा कारखाना थाटून प्रगती केली व कलेची जोपासना केली.सध्या दोन्ही कारखान्यात मिळून 500च्या आसपास गणेश मूर्ती आहेत. भातगाव,राई,ओझरखोल,कुरधुंडा,तेर्ये-बुरंबी अशा विविध गावातून गणेश मूर्तिना मागणी आहे.मोठी गणेश मूर्ती 5 फुटी आहे सध्या कारखान्यात रंगकामची लगबग असून गणेश मूर्तीवर रंग देताना कारखानदार शिवलकर दिसत आहेत.