कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. २९ सप्टेंबर :स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधलेला शौचालयाचे बिल काढून देण्यासाठी 30 हजार रुपयांची लाच स्विकारताना करवीर तालुक्यातील कुर्डू ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी महादेव डोंगळे आणि ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील यांना कोल्हापूर लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळाली माहिती अशी कुर्डू येथील तक्रारदाराने स्वच्छ भारत अभियानातर्गत सार्वजनिक शौचालय बांधले होते. त्याचे बिल 2 लाख 99 हजार मंजूर केले होते. त्यापैकी 1 लाख 97 हजार रुपये खात्यावर जमा केले होते मात्र उर्वरित बिलाची रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील व ग्रामविकास अधिकारी महादेव डोंगळे यांनी 10 टक्के प्रमाणे 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लाचेची मागणी केल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार आज शौचालय बांधकामाचे बिल खात्यावर वर्ग करण्यासाठी 5 हजाराची लाच स्विकारताना ग्रामविकास अधिकारी महादेव डोंगळे याला तर 25 हजाराची लाच स्विकारताना ग्रामपंचायत सदस्य धनाजी पाटील याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पोरे, विकास माने, मयूर देसाई, रुपेश माने, सुरज अपराध यांनी केलीय.