डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती दिनानिमित्त पुरस्कार जाहीर

डॉ. अरुणा रॉय यांना समाजभूषण, विद्याधर अनास्कर यांना समाजकार्य तर पूजा दानोळे हिला युवाप्रेरणा पुरस्कार

शिरोळ: राम आवळे

दि.२५: शिरोळ तालुका व परिसरातील शेतकरी उन्नत व्हावा या ध्येयाने आयुष्याची सात दशकांहून अधिक काळ अखंड कार्य करणाऱ्या डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रांतील मानाचे पुरस्कार यावर्षी जाहीर करण्यात आले आहेत.


सहकार, शेती, शिक्षण, समाजकार्य, उद्योग व क्रीडा क्षेत्रात लोककल्याणाच्या समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या मान्यवरांचा दरवर्षी गौरव करण्याची परंपरा २०१५ पासून सुरू आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचावा या हेतूने हा उपक्रम राबविण्यात येतो.


यावर्षी निवड समितीच्या तीन बैठका पार पडल्या. देश व राज्यपातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांवर सविस्तर चर्चा करून खालील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे:
🔹 डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील समाजभूषण पुरस्कार
डॉ. अरुणा रॉय (माहितीचा अधिकार व ग्रामीण विकास)
पुरस्कार स्वरूप : मानपत्र, स्मृतीचिन्ह व रु. १ लाख रोख
🔹 डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील समाजकार्य पुरस्कार
श्री. विद्याधर अनास्कर (सहकार व बँकिंग)
पुरस्कार स्वरूप : मानपत्र, स्मृतीचिन्ह व रु. ५० हजार रोख
🔹 डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील युवाप्रेरणा पुरस्कार
कु. पूजा दानोळे (आंतरराष्ट्रीय सायकलपटू)
पुरस्कार स्वरूप : मानपत्र, स्मृतीचिन्ह व रु. २५ हजार रोख
हे पुरस्कार प्रख्यात साहित्यिक डॉ. गणेश देवी यांच्या हस्ते तसेच डॉ. यशवंतराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. १ एप्रिल २०२६ रोजी सायं. ५ वाजता ११ व्या स्मृती दिनानिमित्त समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत.
या संदर्भातील पत्रकार परिषदेत निवड समितीचे अध्यक्ष विनोद शिरसाट यांनी माहिती दिली. यावेळी दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील, आमदार अशोकराव माने, कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, माजी संपादक वसंत भोसले यांच्यासह समितीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
सहकार व समाजकारणाच्या माध्यमातून शिरोळ तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या डॉ. आप्पासाहेब पाटील यांच्या कार्याचा वारसा जपण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार सोहळा दरवर्षी उत्साहात पार पडतो.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.