एका अपत्यावर किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या कामगार कुटुंबियांचा यथोचित सत्कार

गोल्डविंग च्या सौ. मौश्मी आवाडे आणि लक्ष्मी विष्णू सहकारी बँकेच्या सौ. वृषाली साळी यांची प्रमुख उपस्थिती

इचलकरंजी : विजय मकोटे
दि. १३ जुलै :महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कोल्हापूर यांच्यावतीने जागितक लोकसंख्या दिनानिमित्त इचलकरंजी येथील कामगार कल्याण मंडळ कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एका अपत्यावर किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या कामगार कुटुंबियांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या समारंभास गोल्डविंग च्या संस्थापिका अध्यक्षा सौ. मौश्मी आवाडे आणि लक्ष्मी विष्णू सहकारी बँकेच्या चेअरमन सौ. वृषाली साळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधत कामगार कल्याण मंडळाच्यावतीने दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जाते. सातत्याने वाढणार्‍या लोकसंख्येवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे. त्याचबरोबर लोकसंख्यावाढीमुळे उद्भवणार्‍या समस्यांशी लढा देऊन व जनजागृती करणे हा ह्या कार्यक्रमामागचा हेतू आहे. त्या अनुषंगाने एका अपत्यावर अथवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या कामगार कुटुंबियांचा सत्कार केला जातो. यंदाही जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त इचलकरंजी येथील कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात कार्यक्रम पार पडला.
यावेळी यावेळी श्री. व सौ. हिना फिरोज कलावंत, श्री. व सौ. विद्या प्रशांत एतावडेकर, श्री. व सौ. सिमा दिलीप मिसाळ, श्री. व सौ. राणी महादेव खडके, श्री. व सौ. अर्चना रामदास पवार या दाम्पत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पाच हजार रुपये, शाल, श्रीफळ, फेटा व भेटवस्तू असे सत्काराचे स्वरुप होते.
प्रारंभी कामगार कल्याण अधिकारी विजय शिंगाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कार्यक्रमास कोरवी समाजाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षा कविता कोरवी, इंदिरा महिला सूत गिरणीच्या संचालिका नजमा शेख, जवाहर साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर, गुणवंत कामगार सुरेश पवार, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे कामगार अधिकारी श्री. कदम, केंद्रप्रमुख सचिन खराडे, सुहास कांबळे, संग्राम सटाले आदी उपस्थित होते.