इचलकरंजी महानगरपालिका वर्धापन दिनाचा समारोप ‘हास्य धमाका’ ने जल्लोषात
इचलकरंजी :अन्वर मुल्ला
दि .३०:इचलकरंजी महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण जून महिन्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचा समारोप रविवारी (दि. २९ जून) श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे ‘हास्य धमाका’ या बहारदार कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल आवाडे, आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे व सहभागी कलाकार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी आयुक्त पल्लवी पाटील यांनी महानगरपालिकेच्या कार्याचा आढावा घेऊन भविष्यातील विकास आराखडा मांडला. त्यांनी आमदार डॉ. राहुल आवाडे यांना तसेच उपस्थित मान्यवरांना सहकार्याचे आवाहन केले. यावर आमदार डॉ. आवाडे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून इचलकरंजीच्या विकासासाठी आवश्यक त्या सर्व मदतीची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरलेले ‘हास्य धमाका’ सादर करताना प्रसिद्ध हास्यजत्रा कलाकार अरुण कदम, श्यामसुंदर रजपूत, पृथ्वीक प्रताप, शिवाली परब यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. तसेच सपना हेमन, अक्षता सावंत यांनी सुरेल हिंदी व मराठी गीतांची मैफल रंगवली, तर आकांक्षा कदम, माया शिंदे, धनश्री दळवी यांनी बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
वर्धापन दिनानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सर्व प्रायोजक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि प्रतिष्ठित नागरिक यांचा विशेष सत्कारही करण्यात आला. वृक्षारोपण उपक्रमांतर्गत गोल्ड विंग फाउंडेशनच्या वतीने आमदार राहुल आवाडे यांनी महानगरपालिकेस १०,००० रोपे प्रदान केली. या योगदानाबद्दल आयुक्त पल्लवी पाटील यांनी त्यांचा विशेष सत्कार केला.
कार्यक्रमासाठी झालेली प्रचंड गर्दी लक्षात घेता नाट्यगृहाच्या लॉन व पॅसेजमध्ये मोठ्या स्क्रीनवर थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली होती.शेवटी आयुक्त पल्लवी पाटील यांनी खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्यासह सर्व मान्यवर, प्रायोजक, सामाजिक-संस्था, आणि शहरवासीयांचे मनःपूर्वक आभार मानले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.