श्री दत्त साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत बायोगॅस प्रकल्पास मंजुरी

मराठवाड्यातील पूरग्रस्तांना देणार मदतीचा हात : गणपतराव पाटील

शिरोळ, : राम आवळे 
दि .२६ : श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या ५६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत उपपदार्थातून सेंद्रिय खत निर्माण करणारा कॉम्प्रेस्ड बायोगॅस उत्पादन प्रकल्प उभारण्यास सभासदांनी एकमताने मंजुरी दिली. याशिवाय, सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषय मंजूर झाले.

राज्यातील पुरस्थिती गंभीर असून पूरग्रस्तांना मदतीसाठी कारखान्याच्यावतीने दोन दिवसांत मदत केंद्र स्थापन केले जाणार असल्याचे सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी जाहीर केले. सभासदांनी या केंद्रात सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील यांनी साखरेची किमान आधारभूत किंमत २०१९ पासून प्रतिक्विंटल ३१०० रुपये इतकीच असून, दर न वाढल्यामुळे उद्योग अडचणीत सापडल्याचे सांगितले. ऊस उत्पादकांना योग्य मोबदला वेळेत देण्यासाठी साखरेची आधारभूत किंमत किमान ४२ रुपये प्रतिकिलो करण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली.

गत हंगामात कारखान्याने १० लाख ७० हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून ११ लाख ६० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. ऊस उत्पादकांना ३२०० रुपये प्रतिटन प्रमाणे एफआरपी अदा करण्यात आली असल्याची माहितीही त्यांनी दिली.

सभेत कारखान्याचे व्हाईस चेअरमन शरदचंद्र पाठक, संचालक मंडळाचे सदस्य, माजी आमदार, स्थानिक मान्यवर तसेच मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले तर राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.