ठाण्यात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा
ठाणे:प्रतिनिधी
दि. 19: संयुक्त राष्ट्र संघटनेने १८ डिसेंबर १९९२ रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक व भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्वीकारला. त्या अनुषंगाने दरवर्षी १८ डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. अल्पसंख्यांक समाजाला त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची माहिती मिळावी, या उद्देशाने अल्पसंख्यांक विकास विभाग व जिल्हा नियोजन समिती यांच्या वतीने ठाणे जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी आणि जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

या कार्यक्रमास जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हा परिविक्षा अधिकारी श्रीमती विवियन सिल्व्हर, पोलीस अधीक्षक विलास कदम, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी निवेदिता पाटील, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी (मानव विकास) दिपाली भोये यांची उपस्थिती होती. तसेच रेडियन्ट इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयाचे सय्यद मोहसीन रिझवी मोहम्मद, इमाम बिरादर, न्यू इंडियन इंग्लिश हायस्कूल, श्रीलंका देवरीपाडा, कौसा–मुंब्राच्या हसीना अब्दुल चौधरी, सेंट जॉन बाप्तीस्ट हायस्कूल, ठाणेच्या कविता चौधरी यांच्यासह मार्गदर्शक, अल्पसंख्यांक समाजातील नागरिक तसेच ठाणे व मुंब्रा परिसरातील विविध शाळांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांनी अल्पसंख्यांक हक्क दिनाबाबत सविस्तर माहिती देताना भारतातील विविधतेतील एकता या संकल्पनेवर भर दिला. भारतीय राज्यघटनेतील कलम २९ व ३० अंतर्गत अल्पसंख्यांकांसाठी महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अल्पसंख्यांक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन विविध योजना व उपक्रम राबवित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त ठरणारे प्रेरणादायी भाषण केले. रेडियन्ट इंग्लिश हायस्कूल व कनिष्ठ विद्यालयाचे सय्यद मोहसीन रिझवी मोहम्मद यांनी भारतासाठी अमेरिकेच्या टॅरिफ आव्हानांचे संधीमध्ये रूपांतर या विषयावर माहितीपूर्ण मांडणी केली. तसेच इमाम बिरादर यांनी अल्पसंख्यांक हक्क या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांक हक्कांशी संबंधित प्रश्न विचारण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे तज्ज्ञांकडून समाधानकारक निरसन करण्यात आले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.