दूध गुणवत्तेची परंपरा अधिक भक्कम करण्यासाठी ‘गोकुळ’चा निर्णायक पुढाकार :नविद मुश्रीफ चेअरमन, गोकुळ दूध संघ
गोकुळची दूध संस्थांसाठी जुनी मिल्को टेस्टर मशीन बायबॅक योजन सुरु
कोल्हापूर:रेणू पोवार
दि.२७ :कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संलग्न प्राथमिक दूध संस्थांसाठी दुधातील फॅट व एस.एन.एफ. तपासणीसाठी वापरात असलेली जुनी ‘मिल्को टेस्टर’ मशिन्स बायबॅक (पुनर्खरेदी) करून त्याऐवजी नवीन, अत्याधुनिक दूध तपासणी अॅनालायझर मशीन उपलब्ध करून देण्याची योजना गोकुळ दूध संघामार्फत राबविण्यात येत आहे. या योजनेतील सहभागी प्राथमिक दूध संस्थांना नवीन अॅनालायझर मशीनचे वाटप आज गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते संचालक मंडळाच्या उपस्थितीत प्रधान कार्यालय, शिरगाव येथे करण्यात आले.
यावेळी बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले की, गोकुळ दूध संघाची ओळख ही दुधाच्या दर्जेदार गुणवत्तेमुळे निर्माण झाली असून, ही गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी संघ सातत्याने प्रयत्नशील आहे. दूध उत्पादकांना त्यांच्या दुधाच्या गुणवत्तेनुसार योग्य मोबदला मिळणे हा गोकुळचा मुख्य उद्देश आहे. दूध संकलनाच्या वेळी फॅट व एस.एन.एफ. तपासणी अचूक व पारदर्शक असणे अत्यावश्यक आहे. अनेक प्राथमिक दूध संस्थांकडे आजही जुनी किंवा वापरात नसलेली तपासणी मशिन्स आहेत. त्यामुळे तपासणीत अचूकतेचा अभाव निर्माण होऊ शकतो.या पार्श्वभूमीवर प्राथमिक दूध संस्थांच्या मागणीनुसार गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाने एकमताने जुनी मशिन्स बायबॅक करून त्याऐवजी नवीन अॅनालायझर मशिन्स देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत नवीन मशिन खरेदीवर तीन ते सहा हजार रुपयांपर्यंत सवलत तसेच तीन वर्षांची वॉरंटी देण्यात येणार आहे. सन १९८२ पासून कार्यरत असलेल्या गोकुळच्या मिल्को टेस्टर विभागामार्फत दूध तपासणी प्रक्रिया अधिक अचूक व विश्वासार्ह करण्यासाठी संघ प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.यावेळी माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील म्हणाले की, दुग्ध व्यवसायात दूध तपासणी व दूध काढणी मशिन्सची स्वच्छता व नियमित देखभाल अत्यंत महत्त्वाची आहे. मशिन्सची योग्य देखभाल, वेळोवेळी दुरुस्ती व दररोज स्वच्छ पाण्याने वॉशिंग केल्यास अचूक तपासणीसह मशिन्सचे आयुष्य वाढते. या बायबॅक योजनेमुळे प्राथमिक दूध संस्थांना निश्चितच फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या योजनेबाबतची सविस्तर माहिती स्वतंत्र परिपत्रकाद्वारे प्राथमिक दूध संस्थांना कळविण्यात आली असून, जास्तीत जास्त संस्थांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले आहे.
या कार्यक्रमास चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन विश्वास पाटील, संचालक शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, युवराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, मिल्को टेस्टर विभाग प्रमुख बाजीराव मुडूकशिवाले, डॉ. एम. पी. पाटील, प्राथमिक दूध संस्थांचे प्रतिनिधी, मिल्क अॅनालायझर कंपनीचे प्रतिनिधी तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.