ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करा: जिल्हाधिकारी अशोक काकडे
सांगली: अय्यान पटेल
दि.११: भारताच्या संरक्षणासाठी त्याचप्रमाणे युध्द किंवा युध्दजन्य परिस्थितीत योगदान दिले, अशा जवानांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा वापर केला जातो. दरवर्षी प्रमाणे सशस्त्र सेना ध्वजदिन निधीस सढळ हाताने मदत करुन आपले बहुमोल योगदान देशहिताच्या महान कार्यास द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, भारतास परकीय आक्रमणापासून स्वतंत्र करण्यासाठी सैनिकांना प्राणाची आहुती द्यावी लागते. देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी हजारो शूर वीरांना युध्दजन्य / शांततेच्या परिस्थितीत शहिदत्व पत्करावे लागते. युध्दभूमीवर किंवा अतिरेक्यांच्या भ्याड कारवायांमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या योद्ध्यांच्या बलिदानाची आपण कोणत्याही स्वरुपात परतफेड करू शकत नाही. परंतु त्यांच्या कुटुंबियांचे / अवलंबितांचे पुनर्वसन करुन निश्चितच अंशत: का होईना परतफेड करू शकतो. त्यासाठी संकलित करण्यात येणारा निधी सशस्त्र सेना ध्वजदिन निधी म्हणून संबोधला जातो. त्या निमित्ताने 7 डिसेंबर 25 ते 30 नोव्हेंबर 26 या कालावधीत निधी गोळा केला जात आहे.जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, भारताच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले, अशा जवानांच्या कुटुंबियांच्या जीवनातील अडीअडचणी दूर करुन त्यांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे, त्याचप्रमाणे युध्द किंवा युध्दजन्य परिस्थितीत अपंगत्व प्राप्त झालेल्या आणि सशस्त्र दलातून सेवानिवृत्त झालेल्या जवानांच्या पुर्नवसनासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचा वापर केला जातो.
सांगली जिल्ह्यातील १६० शूर सैनिकांनी देशरक्षणार्थ आपले बलिदान दिले आहे. याशिवाय ६ हजार ८१८ सैनिकांच्या विधवा आपल्या कुटुंबाची जबाबदारी पेलत आहेत. आपल्या जिल्ह्यातील शूर-वीरांनी ०१ महावीर चक्र, ०९ वीर चक्र, ०१ शौर्य चक्र, ३१ सेना/नौसेना/वायुसेना पदके प्राप्त केली असून आजमितीस ३० हजारपेक्षा जास्त सैनिक देशरक्षणार्थ सज्ज आहेत. जिल्ह्यामध्ये वीर नारी- ७३, वीर माता- १५, वीर पिता- ०५, माजी सैनिक १५ हजार ६० व दिवंगत माजी सैनिकांच्या पत्नी ६ हजार ८१८ व १० सैनिकांचे अनाथ पाल्य वास्तव्यास आहेत.सशस्त्र सेना ध्वजदिन निधीकरिताची संपूर्ण रक्कम आयकर कायदा १९६१ कलम ८० जी (५) (VI) अन्वये करमुक्त आहे. ध्वजदिन निधी संकलनामध्ये सामान्य जनतेचा सहभाग वाढावा या दृष्टीकोनातून सर्व नागरिकांनी UPI/ NEFT / RTGS / ऑनलाईन पध्दतीने यथाशक्ती दान करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.