कोल्हापुरात १५ मार्च रोजी ‘विधी सेवा महाशिबिर’;
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला तयारीचा आढावा
कोल्हापूर: रेणू पोवार
दि. २३ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्हा सत्र न्यायालय परिसरात १५ मार्च रोजी सकाळी १०.०० वा. पासून सुरू होणाऱ्या या शिबिराच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दिपाली डोईफोडे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या शिबिराच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांना एकाच छताखाली सर्व शासकीय योजनांचा लाभ आणि कायदेशीर मार्गदर्शन मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व विभागांच्या प्रमुखांना विशेष सूचना दिल्या. शिबिराच्या ठिकाणी ४० हून अधिक स्टॉल्स महानगरपालिका, आरोग्य, कृषी, जिल्हा कौशल्य विकास, जिल्हा रेशीम उद्योग, जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, सहकार, महसूल, समाज कल्याण, एकात्मिक बाल विकास आणि कामगार कल्याण अशा विविध विभागांचे स्वतंत्र स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, आयुष्मान भारत कार्ड, जातीचे व उत्पन्नाचे दाखले आणि नवीन रेशन कार्ड यांसारख्या सेवा प्रत्यक्ष जागेवरच उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभागांना लाभार्थ्यांची यादी आगाऊ तयार ठेवण्याचे आणि त्यांना शिबिराची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.