‘एआय फॉर ॲग्री २०२६’ परिषदेत जागतिक भागीदारीची ठोस पायाभरणी : अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी

एआय फॉर ॲग्री २०२६ ची सांगता

मुंबई: प्रतिनिधी

दि. २३ : महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणाअंतर्गत आयोजित दोन दिवसीय ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद व गुंतवणूकदार शिखर संमेलन (एआय फॉर ॲग्री २०२६)’ ही केवळ एक परिषद न राहता दीर्घकालीन सहकार्य आणि कृतीप्रधान भागीदारीचे व्यासपीठ ठरल्याचे प्रतिपादन कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी सांगता समारंभात केले.

बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडलेल्या एआय फॉर ॲग्री २०२६ च्या सांगता समारंभ कार्यक्रमात अपर मुख्य सचिव रस्तोगी यांनी परिषदेचा आढावा मांडताना, आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन संस्थांशी झालेल्या भागीदाऱ्या, विविध उपक्रमांचे लोकार्पण आणि धोरणात्मक पुढाकार हे ठळकपणे यादरम्यान दिसून आल्याचे सांगितले.

जागतिक बँक, आशियाई विकास बँक, संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांशी महाराष्ट्र शासनाची भागीदारी ही केवळ प्रकल्पांपुरती मर्यादित नसून दीर्घकालीन सहकार्यावर आधारित आहे. गेल्या दोन दशकांपासून कृषी क्षेत्रात सुरू असलेले प्रकल्प, तांत्रिक सहाय्य आणि धोरणात्मक सल्ला यामुळे राज्याच्या कृषी विकासाला चालना मिळाली आहे.

या परिषदेतून केवळ उच्च दर्जाच्या चर्चा झाल्या नाहीत, तर नवे सहकार्य, उद्योग-विद्यापीठ भागीदारी आणि प्रत्यक्ष क्षेत्रात अंमलबजावणीसाठीची रूपरेषाही तयार झाली आहे. पुढील वर्षी अधिक क्षमतेच्या समांतर सत्रांसह परिषद आयोजित करण्यात येईल, असे अपर मुख्य सचिव रस्तोगी यांनी यावेळी सांगितले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.