इचलकरंजी मनपा शाळांची सभापतींकडून अचानक पाहणी; शैक्षणिक व भौतिक सुविधांचा घेतला आढावा
इचलकरंजी: विजय मकोटे
दि.९: इचलकरंजी महानगरपालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण समितीने आता सक्रिय पावले उचलली आहेत. याचाच भाग म्हणून शिक्षण समितीच्या सभापती सौ. विद्या मनोज साळुंखे व उपसभापती सौ. पूनम सचिन माळी यांनी शहरातील विविध मनपा शाळांना अचानक भेट देऊन तेथील शैक्षणिक आणि भौतिक सुविधांची सखोल पाहणी केली.

या भेटीदरम्यान त्यांनी हुतात्मा बाबू गेनू विद्यालय (क्र. २८), रवींद्रनाथ टागोर विद्यानिकेतन (क्र. २७), छत्रपती संभाजी विद्यामंदिर (क्र. ३५) आणि बाळकृष्ण बुवा विद्यामंदिर (क्र. ७) येथे प्रत्यक्ष वर्गात जाऊन अध्यापन प्रक्रिया, विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि उपलब्ध शैक्षणिक साधन सामग्रीची खातरजमा केली. अध्यापन अधिक परिणामकारक व आधुनिक व्हावे यासाठी शिक्षकांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे आवाहन यावेळी सभापतींनी केले.
पाहणी दरम्यान काही शाळांमध्ये अपुऱ्या वर्गखोल्या, डिजिटल लॅबचा अभाव, पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था, स्वच्छता गृहांची दुरावस्था आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज अशा विविध समस्या प्रकर्षाने निदर्शनास आल्या.
या सर्व त्रुटी प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी तातडीने कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. यामध्ये शाळांमध्ये संगणकांची संख्या वाढवणे, स्वतंत्र डिजिटल कक्ष उभारणे, शिक्षकांना तांत्रिक प्रशिक्षणासह एम.एस-सी. आय.टी. पूर्ण करण्यास प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच जीर्ण इमारतींची दुरुस्ती, नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम आणि पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर यंत्रणा बसवण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने प्रस्ताव सादर करावेत, असे आदेशही त्यांनी दिले. मनपा शाळांचा सर्वांगीण विकास करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वातावरण देणे हेच आमचे ध्येय असून ही कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जातील, असा विश्वास सभापती व उपसभापतींनी यावेळी व्यक्त केला. या प्रसंगी नगरसेविका वैशाली पवार, मोनाली मांजरे, मनीषा कुपटे, नगरसेवक राजू पुजारी, सामाजिक कार्यकर्ते सुनील पवार व अमृतमामा भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.