सामाजिक एकता टिकवून ठेवणे हेच डॉ. बाबासाहेबांना खरे अभिवादन : डॉ. राजेंद्र कुंभार

   ‘भारतीय संविधान आणि आम्ही भारतीय' विषयावर सांगलीत व्याख्यान संपन्न-  सामाजिक समता सप्ताहाची सांगता  

        सांगली: अय्यान पटेल

दि.१ : भारतीय संविधान हे केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नसून ते भारतीयांच्या जगण्याचा मार्ग आहे. संविधानाने दिलेल्या हक्क आणि कर्तव्यांची जाणीव ठेवून सामाजिक एकता टिकवून ठेवणे हेच डॉ. बाबासाहेबांना खरे अभिवादन ठरेल. समाजातील विषमतावाद संपवणे ही जबाबदारी सर्व आंबेडकरप्रेमी व संविधानप्रेमी नागरिकांची आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार यांनी आज येथे केले.

        भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित सामाजिक समता सप्ताहाच्या सांगतेनिमित्त आयोजित ‘भारतीय संविधान आणि आम्ही भारतीय’ या विषयावरील व्याख्यानात त्यांनी विचार व्यक्त केले.       दीपस्तंभ सांस्कृतिक संघ, सांगली येथे आयोजित या व्याख्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपस्तंभ सांस्कृतिक संघाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. जगन कराडे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सामाजिक समतेचा विचार घराघरात पोहोचवण्याचे आवाहन केले.प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण बाळासाहेब कामत यांनी समाज कल्याण विभागाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची तसेच सामाजिक समता सप्ताहामध्ये राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती यावेळी दिली.यावेळी उपस्थित जनसमुदायास भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत वाटप करण्यात आली. तसेच, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक प्रकट वाचन करण्यात आले. 

सामाजिक समता सप्ताह विविध उपक्रमांनी साजरा 

       भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताहाच्या प्रारंभी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या चित्ररथाचे अनावरण करण्यात आले. तसेच समता सप्ताह अनुषंगाने राबविण्यात येणारे कार्यक्रमांची माहिती देण्यासाठी तसेच सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण सांगलीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.दि. ९ एप्रिल रोजी अंधश्रध्दा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायदा बाबत प्रबोधनपर कार्यशाळा वसंतदादा पाटील इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज ॲण्ड रिसर्च सांगली येथे घेण्यात आली. यावेळी अंधश्रध्दा निर्मूलन समिती सांगलीच्या त्रिशला शहा व आशा धनाले यांनी लघुनाटिकेद्वारे विज्ञानवादी दृष्टीकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी प्रयोग सादर केले.

          दि. १० एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सांगली येथे मनी मार्जिन कार्यशाळा तसेच हरिपूर ग्रामपंचायत सभागृहामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा व महिला मेळावा घेण्यात आला. या शिबीरात हरिपूर, सांगलीवाडी, अंकली या आजूबाजूच्या परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमात प्रमुख वक्ते भारती हॉस्पिटल सांगलीचे वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ डॉ. दशरथ सावंत यांनी ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक आरोग्य  या विषयावर मार्गदर्शन केले. दि. ११ एप्रिल रोजी कार्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच याअनुषंगाने समाज कल्याण विभागाच्या अधिनस्त शासकीय निवासी शाळा व वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. दि. १२ एप्रिल रोजी शासकीय मुलींचे वसतिगृह मिरज येथे संविधान जागर व संविधान जनजागृतीसाठी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे समाजशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. जगन कराडे यांनी मार्गदर्शन केले.दि.१३ एप्रिल रोजी ग्रामपंचायत विजयनगर (ता. मिरज) येथे स्वच्छता अभियान  व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीचे औचित्य साधून ग्रामपंचायत क्षेत्रात 135 वृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच गावातील प्रत्येक कुटुंबाला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची प्रत वाटप करण्यात आली.दि. १४ एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली कार्यालयात व अधिनस्त सर्व शासकीय निवासी शाळा व वसतिगृहे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.