ऑनलाइन बँकिंग फसवणूक प्रकरणी दोघांना अटक; ₹4.82 लाखांची रक्कम काढल्याचा आरोप

रत्नागिरी:दिपक तुळसणकर

दि १९: रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून ऑनलाइन बँकिंग फसवणूक प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. संबंधितांकडून फिर्यादीच्या खात्यातून सुमारे ₹४.८२  लाखांची रक्कम काढल्याचा आरोप असून पुढील तपास सुरू आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, १७  फेब्रुवारी २०२६  ते ९ मार्च २०२६  या कालावधीत ऑनलाइन पद्धतीने फसवणूक केल्याप्रकरणी २१ मार्च रोजी जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता २०२३  अंतर्गत विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायदा २०००  मधील तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महाजन व उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश मांद्रेकर यांच्या देखरेखीखाली तपास सुरू होता. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास पथकाने १४  एप्रिल रोजी संशयितांचा माग काढला. त्यानुसार, दुर्शेर चव्हाण (वय ४८ , रा. दहिसर, मुंबई) आणि अर्जुन रामचंद्र चौहान (वय ३८ , रा. अंधेरी, मुंबई) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी फिर्यादीच्या बँक खात्यातून ₹४,८२ ०००  काढल्याची कबुली दिल्यानंतर १७  एप्रिल रोजी रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली.
या कारवाईत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभय तेली व पथकाने सहभाग घेतला.या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आणखी आरोपींचा शोध घेतला जात आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.