पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली मोटेवाडी दुर्घटनेतील रूग्णांची विचारपूस
मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 4 लाखांची मदत देणार- जखमींच्या उपचाराचा खर्चही शासन करणार
सांगली: अय्यान पटेल
दि.१३: जत तालुक्यातील मोटेवाडी दुर्घटनेतील जखमी रूग्णांपैकी 4 रूग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथे उपचारासाठी दाखल असून, या रूग्णांची राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली. तसेच, शासन त्यांच्या पाठीशी आहे, अशा शब्दात त्यांना धीर दिला. महाराष्ट्राचे रहिवासी असणाऱ्या मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी 4 लाख रूपये मदत देण्यासाठी पाठपुरावा करू व जखमींच्या उपचाराचा खर्च शासनाकडून केला जाईल, असा दिलासा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला.
मोटेवाडी येथे दिनांक 12 मे 2026 रोजी अवकाळी पावसामुळे मंदिराशेजारील पत्र्याचा शेड उडून भिंतीवर धडकल्याने भिंत कोसळून मरगुबाई यात्रेनिमित्त आलेल्या 6 भाविकांचा मृत्यू झाला, तर 13 जण जखमी झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या दुर्घटनेबाबत खंत व्यक्त करत तातडीने घटनेची माहिती घेऊन जखमींना धीर दिला व ते लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज येथील भेटप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, पालकमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. रूपेश शिंदे आदि उपस्थित होते.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तयार केला असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, हा प्रस्ताव उद्या होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मांडू. मदत व पुनर्वसन मंत्र्यांशी बोलून लवकरात लवकर मृतांच्या वारसांना मदत देण्यासाठी पाठपुरावा करू. जखमींच्या उपचारांचाही सर्व खर्च शासनामार्फत केला जाईल. यासंदर्भात आवश्यक ती सर्व मदत देण्याच्या सूचना त्यांनी यावेळी यंत्रणांना दिल्या.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष म्हणाले, जखमी रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. या दुर्घटनेत मृत व्यक्तिंच्या वारसांना शासनाकडून अनुदान देण्यासाठी प्रस्ताव तयार केला असून तो आज शासनास पाठविण्यात येईल. घटनास्थळी तात्काळ महसूल व पोलीस यंत्रणेने जाऊन आवश्यक सर्व कार्यवाही केली असल्याचे त्यांनी सांगितले.
जत तालुक्यातील मोटेवाडी येथे मरगुबाई देवस्थानच्या यात्रेला कर्नाटक-महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक येतात. दि. 12 मे रोजी अचानक झालेल्या वादळी पावसामुळे भाविक संरक्षणासाठी भिंतीजवळ आडोशाला गेले. मात्र मंदिराशेजारील पत्र्याचा शेड उडून भिंतीवर आदळल्याने तीच भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्यांपैकी 3 जण जत तालुक्यातील आहेत, तर 3 जण कर्नाटकचे आहेत. मृत व्यक्तींमध्ये 4 पुरुष आणि 2 महिला (पुरुषांमध्ये दोन 15 ते 16 वयोगटातील मुले आहेत). एकूण 13 जण जखमी असून त्यांच्यावर मिरज मेडिकल कॉलेज, सांगली, सिनर्जी हॉस्पिटल, सांगली, जत, संख आणि विजापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.