जांबारी फाटा येथे गावठी हातबॉम्बचा स्फोट
महिलेचा हात गंभीर जखमी, २९ जिवंत बॉम्ब जप्त
रत्नागिरी :नियाझ खान
दि.१९ मे २०२६ : जयगड सागरी पोलीस ठाणे हद्दीतील वाटत-जांबारी फाटा परिसरात आज पहाटे गावठी हातबॉम्बचा स्फोट होऊन एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौ. रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४७, रा. वाटत खंडाळा, जांबारी फाटा) या आज सकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास जांभळी फाटा येथील भूत बंगल्याच्या पाठीमागील मोकळ्या जागेत बांबूची लाकडे गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी लाकूड तोडत असताना उघड्यावर पडलेल्या गावठी हातबॉम्बला त्यांच्या हाताचा स्पर्श झाला. त्यानंतर अचानक स्फोट होऊन त्यांच्या डाव्या हाताच्या बोटांना गंभीर दुखापत झाली.

या प्रकरणी जयगड सागरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा क्रमांक २८/२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२५(अ), १२५(ब), २८८ तसेच भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियम कलम ३, ४ व ५ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोधक व नाशक पथक (BDDS) तसेच फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपासादरम्यान त्या परिसरातून आणखी २९ जिवंत गावठी हातबॉम्ब आढळून आले. त्यामुळे पोलिस प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.या घटनेची गंभीर दखल घेत मा. अप्पर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी तसेच मा. डीवायएसपी श्री. माईनकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केले.दरम्यान, घटनास्थळी सापडलेले २९ जिवंत गावठी हातबॉम्ब न्यायालयाची परवानगी घेऊन सुरक्षितरीत्या नष्ट करण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास जयगड सागरी पोलीस ठाणे करीत आहे
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.