शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला सर्वोच्च प्राधान्य; नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचे संकेत

रत्नागिरी : नियाझ खान 

दि. १९ : शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक हा प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी सर्व संबंधितांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिले. जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीच्या बैठकीत ते बोलत होते.बैठकीला उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, तसेच शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, एस.टी. महामंडळ आणि विविध शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

          बैठकीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापन आणि वाहन चालकांसाठी महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. शालेय परिवहन समितीमार्फत स्कूल बस व वाहनांची नोंदणी प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र, विमा आणि चालक परवाना यांसारख्या कागदपत्रांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच शाळांच्या वाहनतळावर सुरक्षित वाहतुकीबाबत माहिती फलक लावणे आणि वाहनांचे थांबे निश्चित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

           शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावली व न्यायालयीन निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्या शाळा व्यवस्थापनांवर तसेच अवैध आणि धोकादायक पद्धतीने विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याचे संकेत बैठकीत देण्यात आले. या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

         विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांसमोरील रस्त्यांवर गतिरोधक, रंबलर स्ट्रिप्स आणि इशारा फलक उभारण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. तसेच पोलीस व परिवहन विभागाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची अचानक आणि सखोल तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले.

          ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळांच्या मागणीनुसार अतिरिक्त एस.टी. बसेस उपलब्ध करून देण्याबाबत राज्य परिवहन महामंडळाला सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय शैक्षणिक सहली आणि क्रीडा स्पर्धांसाठी केवळ अधिकृत स्कूल बसेस किंवा एस.टी. महामंडळाच्या बसेसचाच वापर करण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले.

            प्रशासनाने पालकांनाही आवाहन केले असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अधिकृत आणि सुरक्षित वाहतूक साधनांचाच वापर करावा तसेच कोणत्याही अनधिकृत वाहनातून मुलांना प्रवास करू देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.